आरक्षणासाठी मराठा समाजाचा एल्गार
मुंबई : प्रतिनिधी
मराठा आरक्षणावरील स्थगिती हटविण्यासह विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी मराठा क्रांती मोर्चातर्फे शनिवारी (दि. 7) सायंकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी मशाल मोर्चाद्वारे कूच करण्यात आली. पोलिसांनी हा मोर्चा अडविला. या वेळी मराठा आंदोलकांनी राज्य सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
वांद्रे जिल्हाधिकारी कार्यालयापासून मोर्चाला सुरुवात झाली. ‘मातोश्री’वर मशाल मोर्चाला परवानगी नाकारण्यात आली होती. आक्रमक मराठा समाजाने ही परवानगी झुगारून मोर्चा काढला, मात्र पोलिसांनी तो अडवला. त्यामुळे उशिरापर्यंत आंदोलक व पोलीस यांच्यात तणाव होता.
पंढरपुरात आक्रोश मोर्चा
पंढरपूर ः आरक्षणासाठी मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने शनिवारी (दि. 7) पंढरपूरमध्ये श्री विठ्ठल मंदिराची नामदेव पायरी ते शहर पोलीस ठाण्यापर्यंत आक्रोश मोर्चा काढण्यात आला. या वेळी मोर्चेकर्यांनी राज्य सरकारचा निषेध केला.
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा क्रांती ठोक मोर्चाचा शनिवारी पंढरपूर ते मंत्रालय आक्रोश मोर्चा नियोजित होता. पंढरपुरातून पायी चालत मराठा कार्यकर्ते मुंबईच्या दिशेने निघणार होते, मात्र प्रशासनाने पंढरपुरात संचारबंदी लागू केली तसेच पोलीस फौजफाटाही तैनात करण्यात आला. आक्रमक मराठा बांधवांनी शासनाचा आदेश झुगारून श्री विठ्ठल मंदिर ते शहर पोलीस ठाण्यापर्यंत पायी मोर्चा काढला. यानंतर समन्वयकांची पुण्यात मुख्य सचिवांसोबत बैठक झाली. या बैठकीत मागण्या मांडण्यात आल्या. त्यांची पूर्तता न झाल्यास यापुढेही आंदोलनाचा मार्ग अवलंबिणार असल्याचे या वेळी स्पष्ट करण्यात आले.