Breaking News

शैक्षणिक फी कमी करा; रोह्यातील राठी इंग्लिश स्कूलच्या व्यवस्थापनाला पालकांचे निवेदन

रोहे : प्रतिनिधी

विद्यार्थ्यांची चालू शैक्षणिक वर्षाची शालेय फी निम्मी घ्यावी, अशी मागणी करीत सोमवारी (दि. 9) सकाळी येथील जे. एम. राठी इंग्लिश स्कूलच्या व्यवस्थापनाला पालकांनी निवेदन दिले. स्कूलच्यावतीने हे निवेदन गणेश पवार यांनी  स्वीकारले. सरकारचे 2020 व 2021 या शैक्षणिक वर्षाच्या शालेय फीबद्दल अद्याप कोणतेही स्पष्ट धोरण नसताना रोहे तालुक्यातील जे. एम. राठी इंग्लिश स्कूलने 9 नोव्हेंबरपर्यंत शालेय फी भरण्याची मुदत दिली आहे. या पार्श्वभूमीवर पालकांनी शनिवारी सायंकाळी रोह्यातील शासकीय विश्रामगृहात बैठक घेतली. निसर्ग चक्रीवादळ आणि कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांची आर्थिक परिस्थिती बिकट आहे. विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण देण्यात येत असल्याने मुले अद्याप शाळेत गेलीच नाहीत. त्यामुळे राठी इंग्लिश स्कूलने 2020 व 2021 या शैक्षणिक वर्षाची शालेय फी निम्मी घ्यावी, असा ठराव या पालक बैठकीत करण्यात आला होता. त्यावेळी पालकांची एक प्रातिनिधिक समितीही गठीत करण्यात आली होती. या पालक समितीने सोमवारी सकाळी जे. एम. राठी इंग्लिश स्कूलच्या व्यवस्थापनाला निवेदन दिले. यावेळी शेकडो पालक राठी इंग्लिश स्कूलच्या समोर जमा झाले होते. यावेळी 2020 व 2021 या वर्षाची निम्मी फी घ्यावी, अशी मागणी असलेले निवेदन जे. एम. राठी इंग्लिश स्कूल व्यवस्थापनाला देण्यात आले. पालक व शाळा व्यवस्थापन समिती यांच्यात चर्चा होत नाही, तोपर्यंत फीसाठी शाळेने तगादा लावू नये तसेच फी संदर्भात पालकांची एक बैठक आयोजित करण्याचे व्यवस्थापनाने मान्य केल्याचे पालक समितीचे बी. एन. कदम यांनी सांगितले.

Check Also

शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव

पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …

Leave a Reply