Breaking News

पालीमध्ये पाणीटंचाई; पाटबंधारे विभागाचा हलगर्जीपणा

पाली : प्रतिनिधी

कोलाड पाटबंधारे विभागाच्या हलगर्जीपणामुळे पाली (ता. सुधागड) मधील ग्रामस्थांना गेल्या तीन दिवसांपासून पाणीटंचाईच्या झळा बसू लागल्या असून, त्यांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. अंबा नदीवर बलाप गावाजवळील उभारलेल्या केटी बंधार्‍यातून पाली शहराला पाणी पुरवठा केला जातो. केटी बंधार्‍याचे दरवाजे किंवा फळ्या बंद करुन अंबा नदीचे पाणी अडविले जाते. मात्र यंदा कोलाड पाटबंधारे विभागाने  अजूनही हे दरवाजे बसविले नाहीत. त्यामुळे नदीचे पाणी कमालीचे घटले आहे. पाणी पातळी घटल्याने जॅकवेलमधील पाणी खेचणारे तीन मोटारपंपदेखील जळाले आहेत. परिणामी मागील तीन दिवसांपासून पालीमधील ग्रामस्थांवर पाणी टंचाईचे संकट ओढावले आहे. नादुरुस्त मोटारपंप दुरुस्तीसाठी दिले असून, नवीन पंप मागविले असल्याची माहिती ग्रामपंचायत सदस्य भास्कर दुर्गे यांनी दिली. दरम्यान, पाणी पातळी वाढविण्यासाठी अंबा नदी जवळी पुलाजवळ तात्पुरता बंधारा बांधला आहे. त्यातून काही भागात आलटूनपालटून पाणी पुरवठा करत असल्याचे सरपंच विजय मराठे यांनी सांगितले. केटी बंधार्‍याच्या फळ्या किंवा दारे कधी बसवणार यासाठी पाटबंधारे विभागाकडे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.

बंधार्‍याच्या फळ्या बसविण्यासाठी कोलाड पाटबंधारे विभागाकडे पत्रव्यवहार तसेच कार्यलायत जाऊनदेखील पाठपुरावा केला आहे. मात्र अजूनही याबाबत त्यांनी कोणतीच कार्यवाही केलेली नाही. पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत. नागरिकांनी सहकार्य करावे. -विजय मराठे, सरपंच, पाली, ता. सुधागड

वारंवार होणार्‍या अनियमित पाणी पुरवठ्यामुळे ग्रामस्थांची गैरसोय होते. या समस्येवर कायम स्वरूपी उपाययोजना करणे गरजेचे आहे. पाटबंधारे विभागाने बंधार्‍याच्या फळ्या वेळच्यावेळी काढण्याचे व लावण्याचे काम करणे गरजेचे आहे. -किरण खंडागळे, ग्रामस्थ, पाली

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply