Breaking News

श्रीवर्धनमध्ये भाजपने रणशिंग फुंकले

श्रीवर्धन : रामप्रहर वृत्त – तटकरे कुटुंबीयांनी खासदार, आमदार व महत्त्वाचे पदे स्वत:कडे ठेवली आहेत, येथील युवकांना त्यांनी जाणीवपूर्वक डावलले आहे. भाजप त्यांची घराणेशाही संपवेल आणि रयतेचे राज्य आणेल, असे प्रतिपादन भाजप युवा मोर्चाचे रायगड जिल्हाध्यक्ष अमित घाग यांनी श्रीवर्धनमध्ये  केले.

आगामी नगरपालिका व ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर  श्रीवर्धन येथील सार्वजनिक वाचनालयात भाजप कार्यकर्त्यांची सभा घेण्यात आली. त्यात अमित घाग मार्गदर्शन करीत होते. येत्या निवडणूकीत श्रीवर्धनमध्ये भाजपचे कमळ फुलवू, असा दावा त्यांनी या वेळी व्यक्त केला.

निसर्ग चक्रीवादळामध्ये तटकरेंनी फक्त स्वपक्षातील पदाधिकार्‍यांना मदत मिळवून देऊन, त्यांचे खिसे भरले व अतिशय खालच्या दर्जाचे राजकारण केले. त्याची शिक्षा श्रीवर्धनमधली जनताच त्यांना देईल, असे

सांगून भाजपचे श्रीवर्धन तालुकाध्यक्ष प्रशांत शिंदे यांनी राष्ट्रवादीवर सडकून टीका केली.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे, मात्र श्रीवर्धनमध्ये  राष्ट्रवादीकडून डावलले जात असल्याचा आरोप शिवसैनिकांकडून केला जात आहे. शिवसैनिक तयार असतील तर राष्ट्रवादीला श्रीवर्धनमधून संपवून टाकू, असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला.

भाजपने विविध योजना तालुक्यात राबविल्या आहेत. दिघी विभागातील 1500 लोकांना या योजनांचा लाभ मिळवून दिला आहे. श्रीवर्धन तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी भाजप कटीबध्द असून, या वेळी निवडणुकीच्या रिंगणात नवीन चेहरे आणणार असल्याची माहिती प्रशांत शिंदे यांनी या वेळी दिली.

या सभेत श्रीवर्धन तालुक्यातील भाजप युवा मोर्चाच्या नवीन पदाधिकार्‍यांची निवड करण्यात आली. भाजपचे जिल्हा सरचिटणीस मिलिंद पाटील, उपाध्यक्ष अ‍ॅड. जयदिप तांबुटकर यांच्यासह युवा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Check Also

केळवणे येथे आमदार महेश बालदींच्या प्रचाराचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्ष केळवणे येथे उरण मतदार संघाचे दमदार आमदार महेश …

Leave a Reply