Breaking News

राज्यात अनेक प्रकल्प रखडले : नितीन गडकरी; महाविकास आघाडी सरकारच्या बेफिकीर कारभारावर टीका

नागपूर : प्रतिनिधी

राज्यात अनेक प्रकल्प सध्या रखडले आहेत. आपले सरकार असते तर अनेक प्रकल्पांना लगेच परवानगी मिळाली असती, मात्र हे सरकार म्हणजे म्हातार्‍या बैलासारखे आहे. टोचणी दिल्याशिवाय चालतच नाही, अशी टीका केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी (दि. 29) केली. केंद्रीय मंत्री गडकरी आपल्या धडाकेबाज कामासाठी आणि परखड बोलण्यासाठी ओळखले जातात. त्यांच्या कामाच्या धडाक्याचे सर्वच विरोधी पक्षांनीही वेळावेळी कौतुक केलेले आहे. सध्या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकांचा प्रचार सुरू असून, त्यासाठीच्या प्रचारसभेत बोलताना गडकरींनी राज्यातील उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारबद्दल नाराजी व्यक्त केली. गडकरी म्हणाले, नागपूरमधल्या ब्रॉडगेज मेट्रोसाठी राज्य सरकारची परवानगी मिळायला एक वर्ष लागले. त्यासाठी मी अजित पवार, एकनाथ शिंदे यांना फोन करून फॉलोअप घेतला. अशा प्रसंगी कळते की आपले सरकार असते तर एक महिन्यात मंजुरी मिळाली असती. नागपूरला आंतरराष्ट्रीय विमानतळ मंजूर झाले होते. त्यासाठी कंत्राटही निघाले होते, मात्र सरकार बदलले आणि तो प्रकल्प रखडला. असे अनेक प्रकल्प सध्या रखडले आहेत. माजी मुख्यमंत्री व विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही या वेळी राज्य सरकारवर हल्लाबोल केला.

राज्य सरकार गोंधळलेले : चंद्रकांत पाटील

पुणे : प्रतिनिधी सकाळी भांडायचे आणि दुपारी आपण भांडलो तर सरकार पडेल, मग भाजप येईल असे म्हणून संध्याकाळी पुन्हा जुळविण्यासाठी आणि सरकार चालवण्याचा प्रयत्न राज्यात वर्षभर झाला. यात सामान्य माणूस भरडला. हे गोंधळलेले सरकार आहे, असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. म्हणाले. आम्हीदेखील मर्यादा पाळतो. उद्धव ठाकरे यांना उठा, जयंत पाटील यांना जपा आणि शरद पवार यांना शपा म्हणायचे का? पण आमची ही संस्कृती नसल्याचेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले. 13 महिन्यांपूर्वी निवडणुकीपूर्वी असलेली युती स्वाभाविकपणे अस्तित्वात यायला हवी होती, पण ज्यांना नाकारले होते ते सत्तेत आले. अकृत्रिमपणे निर्माण झालेल्या सरकारला एक वर्ष पूर्ण झाले आहे. या वर्षभरात खुर्चीसाठी वाटेल तो अपमान सहन करणे, पण भाजप सत्तेत येईल या भीतीने पुन्हा एकत्र येणे असे प्रकार घडले आहेत. या वर्षभरात अनेक भ्रष्टाचार झाले. कोरोनातही भ्रष्टाचार झाले. प्रत्येक भ्रष्टाचार बाहेर येईल, त्यांचे वाभाडे निघतील म्हणून हे सरकार अधिवेशन घ्यायला घाबरत असल्याचा आरोप चंद्रकात पाटील यांनी केला. सध्या शिक्षण क्षेत्राचा बट्ट्याबोळ झाला आहे. कोणी म्हणते आज शाळा सुरू होईल, कोणी म्हणते होणार नाही. तोच गोंधळ आता दहावीच्या परीक्षेवरून सुरू आहे. शिक्षण क्षेत्राची अवस्था वाईट झाली आहे, असे पाटील यांनी नमूद केले. ते पुढे म्हणाले कर्जमाफी केली तीदेखील व्यवस्थित झालेली नाही. या सरकारच्या काळात सर्वाधिक नुकसान शेतकर्‍यांचे झाले आहे. अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना अजूनही नुकसानभरपाई मिळाली नाही. नियमित कर्ज भरणार्‍या शेतकर्‍यांना अनुदान मिळाले नाही. अनेक शेतकर्‍यांचे कर्ज माफ झाले नाही. या सरकारने मराठा आरक्षणाचे मातेरे करून टाकले. देवेंद्र फडणवीस यांनी अतिशय कष्टाने आरक्षण मिळून दिले होते, पण या सरकारला हे आरक्षण टिकवता आले नाही. शिक्षणातील आरक्षण यांनी आता रद्द केले, असेही पाटील यांनी सांगितले.

Check Also

पोषण आहारात मृत उंदीर सापडल्याच्या घटनेतील तपासणीचे नमुने नाकारणार्‍या प्रयोगशाळांवर कारवाई करणार

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रश्नावर ना.आदिती तटकरेंचे उत्तर पनवेल : रामप्रहर वृत्ततपासणीसाठी पाठवलेले नमुने नाकारणार्‍या …

Leave a Reply