Breaking News

मराठा समाजाची पेणमध्ये निदर्शने

  • राज्य सरकारच्या कारभाराविरोधात संताप
  • महावितरण भरतीमध्ये सामावून घेण्याची मागणी

पेण : प्रतिनिधी
आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे, एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देत मंगळवारी (दि. 1) मराठा समाज बांधवांनी पेण महावितरण कार्यालयावर धडक देत निदर्शने केली. महावितरणमध्ये मराठा तरुणांची भरती करण्यात यावी, अशी मागणी या वेळी करण्यात आली.
एमएसईडीसीएल अंतर्गत उपकेंद्र सहाय्यक पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांच्या कागदपत्रे पडताळणी यादीत एसईबीसी अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांचा समावेश राज्य सरकारने केला नाही. यामुळे मराठा समाजाच्या उमेदवारांना डावलून होत असलेल्या या भरतीस तीव्र आक्षेप घेत मंगळवारी राज्यभरातील अधीक्षक अभियंता कार्यालय येथे निदर्शने करण्यात आली. रायगड जिल्ह्यातील महावितरणच्या उमेदवारांची कागदपत्र पडताळणी पेण सर्कलला होणार आहे. ती हाणून पाडण्यासाठी पेण येथे जमून जिल्ह्यातील मराठा समाजाने निदर्शने केली.
मराठा मोर्चा जिल्हा समन्वयक विनोद साबळे यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या मोर्चात मराठा समाज पेण तालुका संघटक मंगेश दळवी, शहर सल्लागार राजेंद्र वारकर, सामाजिक कार्यकर्ते हरिष बेकावडे, तालुका संघटक अविनाश पाटील, शहर कार्याध्यक्ष मयुर सावळे, सुनील सत्वे, सुनील पाटील, कमळाकर लबडे, सचिन भगत, मनोज पवार, महादेव कचरे, विष्णू कदम आदींसह समाजबांधव व भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या वेळी बोलताना विनोद साबळे यांनी सांगितले की, मराठा समाजाला विश्वासात घेऊन पुढील भरती प्रकिया करण्यात येणार असल्याचे राज्याच्या ऊर्जामंत्र्यांनी स्पष्ट केले होते तसेच मुख्यमंत्र्यांनी आंदोलन न करण्याचे आवाहन केले होते, पण एकीकडे भरती चालू करून त्यामध्ये मराठा समाजातील उमेदवारांना डावलण्याचे काम होत असल्याने राज्य सरकार अन्याय करीत असून, खोटी आश्वासने देण्याचे काम होत आहे. त्याचप्रमाणे खासदार संभाजीराजे यांनी जोपर्यंत मराठा समाजातील विद्यार्थ्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत कोणतीच भरती होऊ देणार नाही, असा इशारा राज्य सरकारला दिला होता. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला तात्पुरती स्थगिती जरी दिली असती तरी ती नव्याने होणार्‍या नोकरभरतीस लागू असावी, परंतु मोठा टप्पा पार पडून पडताळणीपर्यंत पोहचलेल्या उमेदवारांवर फक्त कोरोना संकटात आपल्याकडून झालेल्या विलंबामुळे निवड प्रक्रियेपासून दूर ठेवता येणार नाही.
कायद्याच्या प्रक्रियेत राज्य सरकारला मराठा समाजाच्या आरक्षणाविषयी कोणतेच गांभीर्य दिसत नाही. त्यामुळे येत्या 8 डिसेंबरला मुंबईत विधान भवनावर होणार्‍या मोर्चात मोठ्या संख्येने समाजबांधवांनी सहभागी व्हावे, असे आवाहनही साबळे यांनी केले.
मराठा समाज तालुका संघटक मंगेश दळवी म्हणाले की, एमईसीबीमध्ये होणारी भरती राज्य सरकाने त्वरित थांबवून आम्हाला न्याय द्यावा. आमचा कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला विरोध नाही. सर्वांच्या जागा अबाधित ठेवून मराठा समाजातील विद्यार्थ्यांना या भरती प्रक्रियेत सामावून घ्यावे अशी आमची रास्त मागणी आहे.  
सामाजिक कार्यकर्ते हरिष बेकावडे यांनी सांगितले की, आजपर्यंत मराठा समाजाचे जवळजवळ 57 मोर्चे झाले असून, शांततेच्या मार्गाने आंदोलन चालू आहे. आजपर्यंत मराठा समाजाने मोठ्या भावाची बजावली, मात्र कालांतराने मराठा समाजातील विद्यार्थ्यांवर अनेक ठिकाणी भरती प्रक्रियेत अन्याय होऊ लागल्याने सर्व समाजांना जसे आरक्षण मिळाले आहे तसे आरक्षण आमच्या समाजबांधवांनाही मिळावे अशी मागणी आम्ही करीत आहेत. आजच्या भावनांची दखल राज्य सरकारने घेऊन समाजाला न्याय मिळून द्यावा.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply