पनवेल : प्रतिनिधी
पटेल मोहल्ला पनवेल येथील बोहरा चाळीत भाडेकरू राहत असताना विकसक त्यावर स्लॅब टाकून दोन मजली इमारत उभी करीत असल्याने रहिवाशांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. भाडेकरूंनी पालिकेकडे तक्रार करूनही कारवाई होत नसल्याची माहिती देऊन नगरसेवक मुकीत काझी यांनी आयुक्तांकडे कारवाईची मागणी केली आहे.
पनवेलमधील पटेल मोहल्ला येथील बोहरा चाळ येथे शकिल कुरेशी, वाजीद तांबोळी, मुश्ताक काझी यांची कुटुंबे 70 वर्षांपासून वास्तव्यास आहेत. मालकाने जागा विकसकाला दिली असून भाडेकरूंनी घरावर आपला हक्क सांगून योग्य मोबदला दिल्याशिवाय जागा सोडण्यास नकार दिला. विकसकाने चाळीत भाडेकरू राहत असताना त्या चाळीवर बांधकामाला सुरुवात केल्याने त्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. हे बांधकाम अनधिकृत असल्याचे समजल्याने भाडेकरूंनी पालिका आयुक्तांकडे याबाबत तक्रार केली आहे. भाडेकरूंनी पनवेल कोर्टात याबाबत दावाही दाखल केला आहे. पालिकेकडून कारवाई होत नसल्याने भाडेकरूंनी आमदार प्रशांत ठाकूर यांची भेट घेऊन याबाबतचे निवेदन दिले आहे. आमदार प्रशांत ठाकूर यांनी आयुक्तांना 14 जानेवारीस पत्र देऊन संबंधितांकडे चौकशी करून आवश्यक कारवाई करण्यास सांगितल्याची माहिती नगरसेवक मुकीत काझी यांनी दिली.