कारवाई करण्याची ग्रामस्थांची मागणी
रेवदंडा : प्रतिनिधी – रेवदंडा बायपासलगत कचर्याचे साम्राज्य निर्माण झाले असून, तेथून ये-जा करणे धोकादायक बनले आहे. हा कचरा टाकणार्यांवर ग्रामपंचायतीने कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे.
रेवदंडा बायपास रस्त्यालगत रेवदंडा व चौल ग्रामपंचायतींनी संयुक्तपणे ‘येथे कचरा टाकू नये, कचरा टाकणार्यांवर कारवाई करण्यात येईल‘ असा फलक लावला आहे. तरीही तेथे बिनधोकपणे केरकचरा टाकला जात आहे. त्यामुळे रेवदंडा बायपासलगत कचर्याचे साम्राज्य निर्माण झाले असून, हा कचरा कुजल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. परिणामी येथून ये-जा करणे अवघड झाले आहे.
रेवदंडा बायपासलगत चौल ग्रामपंचायतीच्या हद्दीत पूर्वी रेवदंडा ग्रामपंचायतीने तात्पुरते डम्पिंग ग्राऊंड केले होते, परंतु त्याविरोधात आरडाओरड झाल्याने हे डम्पिंग ग्राऊंड बंद करण्यात आले, मात्र तेथे परिसरातील ग्रामस्थांनी केरकचरा टाकणे सुरू ठेवल्याने सध्या कचर्याचे साम्राज्य निर्माण झाले आहे. येथील कचर्याची योग्य विल्हेवाट लावण्यात यावी आणि हा परिसर सीसीटीव्हीच्या निगराणीत ठेवून कचरा टाकणार्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थ विजय भोसले यांनी केली आहे.