Breaking News

कबड्डी महाराष्ट्राचा श्वास, तर रायगड जिल्हा कबड्डीपटूंची खाण -आमदार प्रशांत ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्त
महाराष्ट्राच्या मातीत रूजलेली कबड्डी राज्याचा श्वास असून रायगड जिल्हा कबड्डीपटूंची खाण आहे, असे प्रतिपादन श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी शुक्रवारी (दि. 20) उलवे नोड येथे केले.
गोरगरिबांचे आधारस्तंभ, दानशूर व्यक्तिमत्व माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवस वर्षानिमित्ताने श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पनवेल आणि रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने उलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर 20 ते 22 फेब्रुवारीपर्यंत रायगड जिल्हास्तरीय प्रौढ महिला आणि पुरुष गट जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेचे उद्घाटन लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली आणि आमदार महेश बालदी यांच्या हस्ते झाले. त्या वेळी प्रमुख संयोजक म्हणून आमदार प्रशांत ठाकूर बोलत होते.
उलवे नोडमधील सेक्टर 12 येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलजवळील रामशेठ ठाकूर मैदानावर सुरू झालेल्या या स्पर्धेच्या उदघाटन सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगराध्यक्ष व भाजपचे ज्येष्ठ नेते जे.एम. म्हात्रे, महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे माजी सरकार्यवाह अ‍ॅड. आस्वाद पाटील, पनवेल महापालिकेच्या उपमहापौर प्रमिला पाटील, ज्येष्ठ नेते वाय.टी. देशमुख, श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे सचिव परेश ठाकूर, उपाध्यक्ष अरुणशेठ भगत, स्पर्धा संयोजन समितीचे सचिव शरद कदम, शिवछत्रपती राज्य पुरस्कार विजेते प्रमोद म्हात्रे व सुर्यकांत ठाकूर, जिल्हा कबड्डी असोसिएशनचे माजी सहकार्यवाह जे.जे. पाटील, मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण, भाजपचे माजी शहराध्यक्ष अनिल भगत, ज्येष्ठ नेते जयंत पगडे, रविशेठ पाटील, पंचायत समिती सदस्य वितेश पाटील, जिज्ञासा कोळी, माजी पंचायत समिती सदस्य रत्नप्रभा घरत, कामगार आघाडीचे प्रदेश सचिव संजय भगत, कबड्डी असोसिएशनचे जिल्हा उपाध्यक्ष हिराचंद्र पाटील, खजिनदार जगदीश पाटील, प्रथमेश पाटील, संजय मोकल, नरेश म्हात्रे, प्रफुल्ल पाटील, जनार्दन पाटील, अजिंक्य पाटील, वाहतूक सेनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष प्रभुदास भोईर, न्हावे सरपंच विजेंद्र पाटील, माजी सरपंच जितेंद्र म्हात्रे, भार्गव ठाकूर, रविनाथ पाटील, जयवंत देशमुख, अनंता ठाकूर, अंकुश ठाकूर, योगिता भगत, मिनाक्षी पाटील, निलेश खारकर यांच्यासह सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा क्षेत्रातील मान्यवर तसेच कबड्डीप्रेमी मोठ्या संख्यने उपस्थित होते.
स्पर्धेच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते श्री प्रतिमांचे पूजन झाले. त्यानंतर लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते क्रीडाध्वजाचे रोहण करण्यात झाले, तर आमदार महेश बालदी यांच्या हस्ते क्रीडाज्योती प्रज्वलित करून स्पर्धेचे उद्घाटन झाले. यावेळी स्व. अजितदादा पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
आमदार प्रशांत ठाकूर यांनी आपल्या भाषणात पुढे बोलताना म्हटले की, रायगड जिल्ह्यात अनेक शिवछत्रपती पुरस्कार विजेते घडले आहेत. त्यांच्या पावलावर पाऊल टाऊन अधिकाधिक प्रतिभावंत खेळाडू घडत आहेत. काल शिवजयंतीनिमित्ताने छत्रपती शिवाजी महाराजांना संपूर्ण जगाने अभिवादन केले. त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे. रायगड जिल्ह्याने कबड्डी खेळावर सातत्याने प्रेम केले आहे. पेण, अलिबाग आणि त्या परिसरातील भागात मोठ्या प्रमाणात या खेळाचे आयोजन केले जाते. पनवेलच्या भागात तेवढ्या प्रमाणात कबड्डी रूजली नसली तरी प्रो कबड्डीच्या माध्यमातून पोहचली आहे. अटल सेतू या भागाला जोडलेला आहे त्याचबरोबर नागरीकरणही वाढले आहे. त्यामुळे आगामी काळात खेळाडूंची संख्या वाढणार आहे.
यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी ज्येष्ठ खेळाडूंच्या योगदानाबद्दल आभार व्यक्त करून नवोदित खेळाडूंचे स्वागत करत यांच्यातून उद्याचे उत्तम खेळाडू नेतृत्व करणार आहेत, असे अधोरेखित केले. कबड्डी चळवळीला पाठिंबा देण्यासाठी ज्येष्ठ कबड्डीपटू कार्यरत असून त्यांच्या प्रेरणेने जिल्ह्यातून शिवछत्रपती पुरस्कार विजेते, अर्जुनवीर खेळाडू निर्माण होतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त करून या स्पर्धेच्या आयोजनाची जबाबदारी दिल्याबद्दल कबड्डी असोसिएशनचे आभार मानले.
आगामी राज्यस्तरीय स्पर्धेच्या धर्तीवर जिल्ह्याचा संघ निवडण्याच्या दृष्टीने जिल्हास्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. तीन दिवस चालणार्‍या या स्पर्धेत जिल्ह्यातील 128 पुरुष कबड्डी संघ आणि 32 महिला संघ सहभागी झाले आहेत. यातून निवड झालेल्या खेळाडूंचा संघ महाराष्ट्र राज्य कबड्डी संघाच्या स्पर्धेत रायगडचे प्रतिनिधित्व करणार आहे.
या स्पर्धेच्या अनुषंगाने जवळपास 100 पंच कार्यरत असून सुसज्ज अशी चार क्रीडांगणे, मुख्य स्टेज, प्रशस्त प्रेक्षक गॅलरी, प्रथमोपचार केंद्र, नाश्ता, भोजन तसेच इतर पूरक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

Check Also

रायगड जिल्हा पुरुष व महिला कबड्डी निवड चाचणी स्पर्धेसाठी क्रीडानगरी सज्ज

पनवेल : रामप्रहर वृत्तरायगड जिल्ह्यातील नव्हेच तर राज्यातील प्रतिष्ठेची समजली जाणारी रायगड जिल्हा पुरुष व …

Leave a Reply