पेण : प्रतिनिधी
पशुसंवर्धन विभागाच्या अंतोरे फाटा (ता. पेण) येथील बंदिस्त 562 कोंबड्यांपैकी पाच कोंबड्यांना ’बर्ड फ्लू‘ ची लागण झाल्याचे प्रयोगशाळेतील अहवालानंतर स्पष्ट झाले. त्यामुळे येथील सर्व कोंबड्यांची विल्हेवाट लावण्यात आली असून, जिल्हा प्रशासनाने अंतोरे फाटा परिसरातील सर्व चिकन सेंटर बंद करण्याचे आदेश दिले आहेत.
कोंबड्यांना बर्ड फ्लुची लागण झाल्याचे स्पष्ट होताच पेण पशुसंवर्धन कार्यालयात संबंधीतांची बैठक झाली. या बैठकीस पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉ. सुभाष मस्के, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. मरळे, सदन कुक्कुटपालन विकास गट पशुसंवर्धन विकास अधिकारी डॉ. अर्चना जोशी यांच्यासह इतर पशुसंवर्धन अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पेण पशुसंवर्धन कार्यालयापासून ते पेणमधील एक किलोमीटरपर्यंत खबरदारी घेण्यात आली असल्याची माहिती डॉ. अर्चना जोशी यांनी दिली. दरम्यान, परिसरातील नगरसेवकांनीही जनजागृती करून कोणीही घाबरून न जाता अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले. जिल्हाधिकार्यांच्या आदेशानुसार पेण नगरपालिकेचे कर्मचारी घटनास्थळी पाठविण्यात आले असून, ते तिथे औषध फवारणी करणार आहेत. अंतोरे फाट्यापासून एक किलोमीटर परिसरातील सर्व चिकन सेंटर बंद ठेवण्याचे आदेश दिले असल्याची माहिती मुख्याधिकारी अर्चना दिवे यांनी दिली.