Breaking News

‘अटल करंडक’ एकांकिका स्पर्धेच्या प्राथमिक फेरीला प्रारंभ

सभागृह नेते परेश ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती

पनवेल ः प्रतिनिधी
श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा व चांगू काना ठाकूर महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने सातव्या ‘अटल करंडक राज्यस्तरीय एकांकिका’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. त्याअंतर्गत या स्पर्धेच्या पनवेल केंद्रातील प्राथमिक फेरीला खांदा कॉलनी येथील सीकेटी महाविद्यालयात सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवारपासून (दि. 21) प्रारंभ झाला.
नाट्य चळवळ वृद्धिंगत करण्यासाठी व नाट्य रसिकांना आपले नाट्याविष्कार प्रदर्शित करता यावेत, त्यांना हक्काचे व्यासपीठ मिळावे, तसेच देशाच्या विकासासाठी सदैव धडपडणारे भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या विचारांचा वारसा जपण्यासाठी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखेचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, महापालिका सभागृह नेते व नाट्य परिषद पनवेल शाखा उपाध्यक्ष परेश ठाकूर यांनी ‘अटल करंडक एकांकिका’ या दर्जेदार स्पर्धेचा प्रारंभ केला. नामवंत, उमदे आणि हौशी कलावंत या स्पर्धेकडे नेहमीच आकर्षित होतात. स्पर्धेचे देखणे व नीटनेटके संयोजन, आकर्षक पारितोषिके, दर्जेदार परीक्षण आणि सर्वोत्तम स्पर्धास्थळ यामुळे ही स्पर्धा नाट्यरसिकांच्या गळ्यातील ताईत बनली.
दरवर्षी ही स्पर्धा डिसेंबरमध्ये होते, पण यंदा कोरोनामुळे स्पर्धा जानेवारीत होत आहे. त्या अनुषंगाने पनवेल केंद्रातील प्राथमिक फेरी दिनांक 21 ते 24 जानेवारीपर्यंत चांगू काना ठाकूर स्वायत्त महाविद्यालय खांदा कॉलनी येथे होणार आहे असून गुरुवारपासून स्पर्धेच्या प्राथमिक फेरीला सुरुवात झाली. या वेळी स्पर्धेमध्ये सहभाग घेतलेल्या स्पर्धकांना प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेची अंतिम फेरी 29 ते 31 जानेवारीदरम्यान पनवेल शहरातील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात संपन्न होणार आहे. या वेळी सिनेमा निर्माता कल्पना कोठारी, अभिनेता भारत साळवे, राहुल वैद्य, श्याम पुंडे, अमोल खेर, गणेश जगताप, चिन्मय समेळ आदी उपस्थित होते.

Check Also

आंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक शरद कदम यांचा भाजपमध्ये प्रवेश

पनवेल : रामप्रहर वृत्तआंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक तथा खालापूर तालुक्यातील तांबाटी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच शरद कदम …

Leave a Reply