नवी मुंबई : प्रतिनिधी
वाशीतील घाऊक बाजारात भाजीपाल्याची आवक वाढली असल्याने, भाजीपाल्याचे दर गडगडले आहेत. बहुतांश भाज्या 20 ते 25 रुपये किलोच्या घरात आल्या असून काही भाज्यांचे दर 10 रुपये किलोच्या घरात आले आहेत. त्यामुळे आत्ता ग्राहकांना हव्या तितक्या ताज्या भाज्या खाता येणार आहेत.
हिवाळ्यात भाजीपाल्यासाठी पोषक वातावरण निर्माण होत असल्याने दरवर्षी यादरम्यान बाजारात भाजीपाल्याची आवक वाढते आणि दरही कमी होतात. तशीच परिस्थिती आत्ता ही आहे. त्यात आत्ता भाजीपाल्याची हवी तशी निर्यात होत नसल्याने निर्यातीचा बराच भाजीपाला इथल्या बाजारातच विकावा लागत आहे. त्यामुळे बाजारात मोठ्या प्रमाणात भाजीपाला पाहायला मिळत आहे.
मुंबई आणि उपनगरांना भाजीपाल्याचा योग्य पुरवठा करण्यासाठी बाजारात सरासरी 600 गाड्या भाजीपाल्याची गरज लागते. मात्र आत्ता बाजारात सरासरी 650 भाजीपाल्याच्या गाड्या दररोज बाजारात येत आहेत. मात्र या वेळी मुंबईतून असणारी मागणीही कमी झाली आहे. बाजारात मोठ्या प्रमाणात माल पडून राहतो, मात्र हा माल ठेवून तरी काय करणार म्हणून अगदी कमी दरात हा भाजीपाला घाऊक बाजारात विकला जात आहे.
त्यामुळे सध्या घाऊक भाजीपाला बाजारात, कोबी 6 रुपये किलो फ्लावर 8 रुपये किलो, भोपळा 10 रुपये किलो, काकडी 8 रुपये किलो, पडवळ 12 रुपये किलो सुरण 10 रुपये किलो, टोमॅटो 8 रुपये किलो, वांगी 15 रुपये किलो झाली आहेत. तर हिरवा वाटाण्यांच्या बाजारात दररोज 50 ते 60 गाड्या येत आहेत. त्यामुळे हिरवा वाटाणा 18 ते 22 रुपये किलो झाला आहे. कारली 22 रुपये किलो घेवडा 25 रुपये किलो, भेंडी 20 रुपये किलो, ढोबळी मिरची 25 रुपये किलो, फरसबी 20 किलो झाली आहे, अशी माहिती बाजार समितीने दिली आहे.
भाजीपाल्याच्या दरात घसरण सुरूच असून आणखी काही दिवस हे दर असेच राहणार असल्याचे घाऊक व्यापारी सांगत आहेत. यामुळे आत्ता किरकोळ बाजारात बर्याच प्रमाणात भाजीपाल्याचे दर खाली आले आहेत. त्यामुळे सर्वांना चांगला आणि ताजा भाजीपाला अगदी कमी दरात उपलब्ध होत आहे.
RamPrahar – The Panvel Daily Paper