Breaking News

पनवेल पंचायत समितीचा शिक्षण विस्तार अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

अलिबाग ः प्रतिनिधी
पनवेल तालुका पंचायत समितीचे शिक्षण विस्तार अधिकारी नवनाथ साबळे यांना शुक्रवारी (दि. 29) 10 हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले.  लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या  (एसीबी) रायगड पथकाने ही धडक कारवाई केली.
रायगड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील शिक्षक उमेश इंगोले यांची यवतमाळ जिल्ह्यात बदली झाली. तेथे ते कार्यरतही झाले. बदलीच्या वेळी शिक्षण विस्तार अधिकारी नवनाथ साबळे यांनी त्यांच्याकडे पैशांसाठी तगादा लावला. त्या वेळी इंगोले यांनी पनवेलच्या गटशिक्षणाधिकार्‍यांकडे याबाबतची तक्रार केली. त्यामुळे साबळे यांनी पैसे मागणे थांबविले.
दरम्यान, इंगोले यांची यवतमाळ येथे बदली झाली असली तरी काही कागदपत्रांची पूर्तता करणे बाकी होते. त्यासाठी पुन्हा पैशांची मागणी सुरू झाली. लास्ट पेमेंट स्लीप देण्यासाठी साबळे यांनी त्यांच्याकडे 10 हजारांची मागणी केली. त्यामुळे इंगोले यांनी रायगडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.
मागील दोन दिवस लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पथक साबळेंच्या मागावर होते. अखेर अलिबाग येथील रायगड जिल्हा परिषद मुख्यालयाच्या आवारात सापळा रचण्यात आला. तेथे साबळे यांना लाचेची रक्कम घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा नोंदवण्याची कारवाई सुरू केली आहे. एसीबीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक साळे, कर्मचारी दीपक मोरे, सुरज पाटील, कौस्तुभ मगर, स्वप्नाली पाटील यांनी कारवाईत सहभाग घेतला होता.

Check Also

कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांचा शुभचिंतन सोहळा

कामोठे : रामप्रहर वृत्तरयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये इयत्ता दहावीच्या …

Leave a Reply