नवी मुंबई : सिडको वृत्तसेवा
सिडको महामंडळाकडून नवी मुंबईतील नवीन पनवेल, खारघर, नेरूळ, घणसोली आणि ऐरोली नोडमधील 106 इतक्या मोठ्या प्रमाणावर निवासी भूखंड विक्रीकरिता उपलब्ध करून देण्यात आले आहेत. हे भूखंड हे बंगलो, रो-हाऊस आणि निवासी इमारतींकरिता उपलब्ध आहेत. यामुळे नवी मुंबईमध्ये स्वत:च्या मालकीचे बंगला, रो-हाऊस बांधू इच्छिणारे नागरिक आणि विकासक, बांधकाम व्यावसायिक यांच्याकरिता सुवर्णसंधी निर्माण झाली आहे. या योजनेच्या ऑनलाइन अर्ज नोंदणीस बुधवार (दि. 10)पासून सुरुवात झाली आहे.
या योजनेंतर्गत नवीन पनवेलमधील 28, खारघर येथील 15, नेरूळ येथील 12, घणसोली येथील 38 आणि ऐरोली येथील 13, असे एकूण 106 भूखंड विक्रीकरिता उपलब्ध करून देण्यात आले असून सर्व भूखंड हे केवळ निवासी वापराकरिता आहेत. या भूखंडांकरिता ई-निविदा आणि ई-लिलाव प्रक्रियेद्वारे अर्ज मागविण्यात आले असून अर्ज नोंदणी, निविदा सादर करणे, अनामत रक्कम व शुल्क भरणा इत्यादी सर्व प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने होणार आहेत. योजनेच्या अर्ज नोंदणीस 10 फेब्रुवारीपासून सुरुवात झाली आहे. ई-निविदा प्रक्रिया 12 फेब्रुवारी 2021 रोजी सकाळी 11 वाजता सुरू होऊन 1 मार्च 2021 रोजी सायंकाळी 5 वाजता संपुष्टात येईल. ई-लिलाव प्रक्रिया 3 मार्च 2021 रोजी सकाळी 11 वाजता सुरू होऊन 3 मार्च 2021 रोजी सायंकाळी 5 वाजता संपुष्टात येईल. योजनेची सविस्तर माहिती आणि भूखंडांचा तपशील जाणून घेण्याकरिता अर्जदारांनी https://eauction.cidcoindia.com या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेल्या योजना पुस्तिकेचे (स्कीम बुकलेट) अवलोकन करावे.
सदर योजने अंतर्गत एवढ्या मोठ्या प्रमाणावर भूखंड उपलब्ध करून देण्यात आल्यामुळे, नवी मुंबईसारख्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शहरात आपल्या मनासारखे घर बांधू इच्छिणार्या सर्वसामान्य नागरिकांकरिता आणि विकासकांकरिता मोठी संधी निर्माण झाली आहे. यामुळे बांधकाम क्षेत्रालाही मोठ्या प्रमाणावर चालना मिळण्यास मदत होणार आहे. तरी अधिकाधिक नागरिकांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन सिडकोतर्फे करण्यात आले आहे.
या योजनेमुळे नवी मुंबईमध्ये बंगला, रो-हाऊस, असे आपल्या मनासारखे घर बांधण्याची इच्छा असणार्या सर्वसामान्य नागरिकांचे स्वप्न पूर्ण होणार आहे. त्याचप्रमाणे या योजनेमुळे शहरातील बांधकाम क्षेत्रालाही नवचैतन्य प्राप्त होणार आहे.
-डॉ. संजय मुखर्जी, उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक