कर घेऊ नये-स्थानिकांची मागणी; रोजगार बुडत असल्याने ग्रामस्थ संतप्त
कर्जत : बातमीदार
तालुक्यातील कोथळीगड म्हणजे पेठ किल्ल्यावर प्रवेशासाठी वन विभागाने 50 रुपयांचे शुल्क लावले आहे. त्यामुळे पर्यटक आणि गडप्रेमी यांचे गडावर फिरकणे बंद झाले असून, स्थानिक पेठ ग्रामस्थांचा रोजगार बुडाला आहे. दरम्यान, ग्रामस्थांनी शुल्क घेण्यास विरोध केला असून, प्रवेश शुल्क वसुल करणारी चौकी तात्काळ हलवावी, अशी मागणी केली आहे.
कर्जत तालुक्यात अनेक ऐतिहासिक वास्तू आहेत, त्यापैकीच एक पेठचा किल्ला, ज्याला कोथळीगड असेही संबोधतात. अलिबाग वन विभागाने या किल्ल्यावर जाण्यासाठी सकाळी सात ते सायंकाळी पाचपर्यंत वेळ निश्चित केली आहे. त्यासाठी प्रति व्यक्ती 50रुपये प्रवेश शुल्क आकारले आहे. मात्र त्या बदल्यात पर्यटकांना कोणतीही सुविधा दिली जात नाही. त्यामुळे सदर प्रवेश शुल्क पर्यटकांकडून घेणे बंद करावे, अशी मागणी पेठ ग्रामस्थांनी कर्जत वनविभाग (पूर्व) कार्यालयाकडे निवेदनाद्वारे केली आहे .
पेठच्या किल्ल्यावर जाण्यासाठी असलेल्या रस्त्याच्या मध्यावर वनखात्याची जागा असल्याचे सांगत वनविभागाने तिकीट खिडकी उभारून येणार्या पर्यटकांकडून 50रुपये शुल्क वसूल करणे सुरु केले आहे. जर प्रवेश शुल्क घेता, तर सुविधाही दिल्याच पाहिजेत, असे ग्रामस्थ आणि पर्यटकांचे म्हणणे आहे. गडावर पिण्याच्या पाण्याची सोय (पाणपोई),आसन व्यवस्था, कचरा कुंड्या तसेच किल्ल्यावरील जलकुंभही वेळोवेळी स्वच्छ केले पाहिजेत. मात्र वनविभाग याकडे दुर्लक्ष करत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. याउलट काही दुर्गप्रेमी संस्था येऊन गडावरील जलकुंभ साफ करतात, कचरा गोळा करतात, असे ग्रामस्थांनी सांगितले.
या आहेत ग्रामस्थांच्या मागण्या
प्रवेश शुल्क आकारणे बंद करावे, पर्यटकांना सुविधा द्याव्यात, अनेक वेळा या गडावर येणारे पर्यटक रस्ता चुकून भरकटत. असे प्रकार घडू नयेत, याकरिता वनविभागाने दहा पर्यटकांच्या मागे एक गाईड नेमल्यास गिर्यारोहक तसेच पर्यटकांना गड, किल्ल्याची योग्य माहिती मिळेल आणि जंगलात रस्ता चुकण्याचा समस्येपासून सुटका होईल, यातून स्थानिक तरुणांना रोजगार मिळेल, अशी मागणी पेठ ग्रामस्थांनी वनविभागाकडे केली आहे.
कर घेणे बंद करावे, अशी मागणी आम्ही वन विभागाकडे निवेदनाद्वारे वारंवार केली आहे. या करामुळे गडावर येणारे पर्यटक काहीसे कमी झाले आहेत. कराच्या बदल्यात पर्यटकांना सुविधाही नाहीत. तिकीट खिडकी आंबिवली-पेठ रस्त्यामध्ये लावून वनखात्याची जागा असल्याचे फलक लावण्यात आल्याने रस्त्याचे काम रखडले आहे.
-मनोज पिंपरकर, ग्रामस्थ, पेठ, ता. कर्जत
RamPrahar – The Panvel Daily Paper