पालीत फुलला भक्तिमळा
पाली : प्रतिनिधी
माघी गणेशोत्सवानिमित्त सुधागड तालुक्यातील पाली येथील श्री बल्लाळेश्वराचे दर्शन घेण्यासाठी सोमवारी (दि. 15) रायगड जिल्ह्यासह मुंबई, नवी मुंबई, ठाणे, उपनगर व अन्य शहरातून भाविक आले होते. त्यामुळे बल्लाळेश्वर मंदिर परिसर भाविकांनी फुलून निघाला होता. बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी भाविकांनी पहाटेपासूनच रांगा लावल्या होत्या. ठिकठिकाणाहून आलेल्या पालख्यादेखील पालीत दाखल झाल्या होत्या. श्री गणेशाच्या गजराने वातावरण भक्तिमय व प्रफुल्लित झाले होते. त्यामुळे पालीत जणूकाही भक्तिमळा फुलला होता.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासन नियमांचे पालन करून पालीतील माघी गणेशोत्सव अत्यंत शांततेत व साधेपणाने साजरा करण्यात आला. यंदा उत्सवाला काही मर्यादा व बंधने आल्याने यात्रा आणि काही उपक्रम झाले नाहीत. कीर्तनालादेखील नेमकेच लोक उपस्थित होते. बल्लाळेश्वर मंदिर परिसरात रोषणाई व सजावट करण्यात आली होती. मंदिराबाहेर मोठी आकर्षक रांगोळी काढण्यात आली होती. मंदिरात प्रवेशाचे व बाहेर पडण्याचे मार्ग वेगळे केल्याने एकाच ठिकाणी गर्दी झाली नाही. शहरातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी जागोजागी सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले होते. पोलीस निरीक्षक विजय तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. कळवा येथून आलेले काही युवक मंदिर परिसरात ठिकठिकाणी भाविकांना मोफत मास्क वाटप करत होते.
बल्लाळेश्वर मंदिराच्या माघी महोत्सव बंदोबस्ताकरिता सहा अधिकारी व 109 कर्मचारी नेमण्यात आले आहेत. अवजड वाहने गावात येणार नाहीत तसेच वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पोलीस तैनात करण्यात आले आहेत.
-विजय तायडे, पोलीस निरीक्षक, पाली, ता. सुधागड
माणगावमध्ये श्री सत्यनारायणाची महापूजा; भाविकांची उपस्थिती
माणगाव : प्रतिनिधी
माघी गणेशोत्सवानिमित्त माणगाव येथील तालुका भाजप कार्यालयात सोमवारी (दि.15) श्री सत्यनारायणाची महापूजा आयोजित करण्यात आली होती. या वेळी भाविकांनी मोठ्या संख्येने दर्शन घेतले. दर्शनासाठी आलेल्या भाविकांचे माणगाव तालुका भाजप अध्यक्ष संजयआप्पा ढवळे, महिला मोर्चा तालुका अध्यक्षा शर्मिला सत्वे, माजी तालुकाध्यक्षा यशोधरा गोडबोले तसेच बाबुराव चव्हाण, संतोष जाधव, संतोष कदम, संजय सावंत, रेश्मा मोहिते, नीलम काळे यांनी स्वागत केले.
महड मंदिरात श्री गणेश जन्म सोहळा
खोपोली : प्रतिनिधी
अष्टविनायकापैकी खालापूर तालुक्यातील महड येथील वरदविनायक मंदिरात सोमवारी (दि. 15) श्री गणेश जन्म सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. करोना प्रार्दुभावामुळे शासनाच्या नियमांच्या अधिन राहून देवस्थान कमिटीने पूर्णपणे नियमांचे पालन केले. सोशल डिस्टन ठेवत भक्तांना मंदिरात प्रवेश दिला जात होता.
सोमवारी सकाळी नऊ ते तीन या दरम्यान फक्त स्थानिक ग्रामस्थांना दर्शनासाठी प्रवेश देण्यात आला होता. त्यानंतर बाहेरील भाविकांना दर्शनासाठी परवानगी देण्यात आली. देवस्थान कमिटीच्या अध्यक्षा मोहिनीताई वैद्य यांच्या हस्ते महापूजा करण्यात आली. त्यानंतर कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या वेळी देवस्थान तसेच स्थानिक पोलिसातर्फे सुरक्षा वाढविण्यात आली होती.
खोपोली शहरातील व तसेच तालुक्यातील सावरोली, काटरंग, चिंचवली शेकीन, देवन्हावे येथील गणेश मंदिरातही सोमवारी श्री गणेश जन्म सोहळा साजरा करण्यात आला.
RamPrahar – The Panvel Daily Paper