खारघर : प्रतिनिधी
पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील तळोजा गावातील तलावाचे सुशोभीकरण करण्यास महासभेने मंजुरी दिली आहे. याकरिता सात कोटी 55 लाख 63 हजार खर्च येणार आहे. तळोजा येथील हे तलाव ब्रिटिशकालीन आहे.
तळोजा येथील स्थानिक नगरसेवक हरेश केणी यांनी यासंदर्भात पाठपुरावा केला होता. महासभेत मंजुरी मिळाल्याने लवकरच या विकासकाचे ऑनलाइन टेंडर काढले जाणार आहे. त्यांनतर स्थायी समितीच्या मंजुरीने या विकासकामाला सुरुवात होणार आहे. या तलावाच्या सुशोभिकरणाच्या कामात गाळ काढणे, सुरक्षा भिंत, जॉगिंग ट्रॅक, कारंजे, लहान गार्डन, गणपती विसर्जन घाट, सभोवताली विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे. यामुळे तळोजे येथील या ऐतिहासिक वास्तुच्या शोभेत भर पडणार आहे. नगरसेवक हरेश केणी यांनी महानगरपालिकेच्या स्थापनेपासून तलावाच्या सुशोभिकरणासाठी प्रशासनसोबत पाठपुरावा केला होता.