मुंबई : प्रतिनिधी
राज्यातील कोरोनाचा संसर्ग पुन्हा एकदा झपाट्याने वाढत आहे. मुंबई, पुण्यासह विदर्भातही कोरोनाचे मोठ्या संख्येने रुग्ण आढळून येत आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबईच्या महापौरांनीदेखील लॉकडाऊनचा इशारा दिला आहे. यावरून भाजप नेते आशिष शेलार यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. महापौर म्हणतात लॉकडाऊन, पण बार, पब, नाइट लाइफ-नो लॉकडाऊन! महाविकास आघाडी सरकारने 40 हजार लशींचे डोस वाया घालवले आहेत. पहिल्या टप्प्यातील लसीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यातही ते अयशस्वी ठरले आहेत. साडेचार लाख आरोग्य कर्मचारी सुरक्षित नाहीत. आरोग्यमंत्र्यांना दंड, गुन्हे दाखल, मार्शल लॉ हवा आहे, पण महाविकास आघाडी सरकारने नव्या पेंग्विन कारवान कायद्यावर 100 तास खर्च केलेत, अशा शब्दांत शेलार यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्कात सवलत असतानाही अनेक महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांकडून पूर्ण शुल्काची मागणी केली. त्यामुळे अनेक विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहिल्याचे आता समोर आले आहे. त्यामुळे मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान झाले. मुलांना सक्तीचे आणि मोफत शिक्षण अधिकार कायद्यानुसार खासगी शाळांमध्ये 25 टक्के राखीव जागांच्या प्रवेशाबाबत शाळांकडून दिरंगाईच्या तक्रारी समोर आल्यात. ठाकरे सरकारचे हे कसले धोरण? समुद्राचे पाणी गोडे करण्याच्या कंत्राटावर अर्थपूर्ण लक्ष आणि गरीब, मागासवर्गीय मुलांकडे पूर्ण दुर्लक्ष! असे म्हणत मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या मुद्द्यावरूनदेखील शेलार यांनी राज्य सरकारवर ट्विटद्वारे आसूड ओढले आहेत.
RamPrahar – The Panvel Daily Paper