Breaking News

कोरोनाच्या मुकाबल्यासाठी पालिका प्रशासन सज्ज

नवी मुंबईत कोविड सेंटर पुन्हा सुरू करण्याच्या हालचाली

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त

नवी मुंबई महापालिका कार्यक्षेत्रात मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासन सतर्क झाले आहे. त्यानुसार बंद करण्यात आलेले कोविड सेंटर पुन्हा सुरू करण्याच्या हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत. तर सुरू असलेल्या कोविड उपचार केंद्रांत रुग्णांची संख्याही वाढू लागली आहे.

गेल्या वर्षी दिवाळीनंतर रुग्णांच्या संख्येत घट होऊ लागल्याने शहरातील अनेक कोविड सेंटर बंद करण्यात आले. महापालिकेच्या माध्यमातून एकूण 14 कोविड सेंटर सुरू करण्यात आले होते. त्यापैकी बारा केंद्र बंद करण्यात आले आहेत. यात वाशी सेक्टर 14, सीबीडी सेक्टर 3 येथील कोविड केअर सेंटर, नेरूळ येथील आगरी कोळी भवन, नेरूळ सेक्टर 9 येथील कोविड सेंटर, नेरूळ सेक्टर 5 येथील सावली कोविड सेंटर, ऐरोली सेक्टर 5 येथील समाज मंदिर, वाशी येथील इ.टी.सी केंद्र, कोपरखैरणे सेक्टर 5 येथील बहुउद्देशीय इमारतीतील केंद्र, ऐरोली सेक्टर 15 येथील लेवा पाटीदार सभागृह, तुर्भे सेक्टर येथील निर्यात भवन, तुर्भे सेक्टर 24 येथील राधास्वामी सत्संग भवन व वाशी येथील महापालिका रुग्णालयातील डेडिकेटेड कोविड सेंटर या उपचार केंद्रांचा समावेश आहे.

रुग्ण कमी होत असल्याने महापालिकेने बंद केलेल्या कोविड केंद्राच्या जागा संबंधित संस्थांना परत करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र फेब्रुवारीपासून पुन्हा रुग्णसंख्या वाढू लागल्याने बंद केलेले कोविड सेंटर पुन्हा ताब्यात घेण्याच्या हालचाली महापालिकेने सुरू केल्या आहेत. त्यानुसार संबंधित जागांची साफसफाई आणि इतर आवश्यक कामे केली जात आहेत. औषधे आणि कर्मचार्‍यांचे नियोजन केले जात आहे.

सध्या महापालिकेचे वाशी येथील सिडको एक्झिबिशन केंद्रातील एकमेव उपचार केंद्र सुरू आहे. परंतु खबरदारीच्या उपाययोजना म्हणून तुर्भे येथील बंद केलेले दोन उपचार केंद्र राखीव ठेवण्यात आली आहेत.

-अभिजीत बांगर, आयुक्त, नवी मुंबई महापालिका

Check Also

खारघरमध्ये गुरू तेग बहादुर यांच्या शहिदी समागमाला प्रारंभ; विविध कार्यक्रम

पनवेल : रामप्रहर वृत्तहिंदुस्थानी संस्कृती आणि मानवी मूल्यांच्या रक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती देणारे ‘हिंद दी …

Leave a Reply