उरण : वार्ताहर
महाशिवरात्रीनिमित्त उरण शहरातील महादेवाच्या मंदिरात भक्तांच्या दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या. कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करून भक्तांनी मनोभावे भोळ्या शंकराचे दर्शन घेतले. दरवर्षी शहरातील शंकराच्या मंदिरामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी असते, परंतु कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता शहरातील मंदिरांमध्ये गर्दी कमी होती. अनेकांनी घरातच पूजा, उपवास, नैवद्य करून महाशिवरात्री मोठ्या भक्तीने साजरी केली.
दरवर्षी घारापुरी बेटावरील शिवलिंग दर्शनासाठी गर्दी असते, परंतु यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घारापुरी येथे जाण्यासाठी बोट सेवा बंद ठेवण्यात आली होती. तसेच केगाव येथील माणकेश्वर मंदिर बंद ठेवण्यात आले होते. उरण रेल्वे स्टेशन जवळ असलेले निलकंठेश्वर मंदिर, बोरी गावातील होणेश्वर मंदिर, जेएनपीटी, जवळील शेवाचा शंकर मंदिर आदी ठिकाणी भक्तांची खूपच कमी भक्तांची गर्दी होती.
नागरिकांनी रांगेत राहुन समाजिक अंतर ठेऊन, मास्क लाऊन महादेवाचे दर्शन घेतले. बेल, हार, दुध, बेल फळ वाहून यथासांग पूजा केली. ओम..नमो..शिवाय! या जयघोषाने उरण शहरातील देऊळवाडी परिसर दुमदुमला होता. देऊळवाडी येथील संगमेश्वर मंदिरात सकाळपासूनच भक्त दर्शनासाठी आले होते. मास्क लाऊन व सामाजिक अंतर ठेऊन भक्तांनी दर्शन घेतले. संगमेश्वर शंकराच्या मंदिराच्या नलिनी सखाराम सुतार, स्वाती गणेश सुतार यांनी भक्तांना दर्शनासाठी त्रास होऊ नये यासाठी उत्तम व्यवस्था केली होती.
कोट गावातील कै. वामन (बंटीशेठ) नामदेव गोवारी यांनी देऊळवाडी येथील संगमेश्वर शंकर मंदिरात श्री महाशिवरात्रीनिमित्त उत्सव सुरू केला केला आहे. या उत्सवाला यंदा 70 वर्षे झाली. आता त्यांची मुले, नातवंडे त्याच परंपरेने सेवा करीत आहेत.
उरण चारफाटा साईबाबा मंदिर येथून शंकराची पालखी काढून ती देऊळवाडी येथील संगमेश्वर शंकराच्या मंदिरात आणली. भजन करून आरती करण्यात आली व पुढे साईबाबा मंदिरात ठेवण्यात आली. देऊळवाडी ग्रामस्त व गोवारी कुटुंबीय, कोटगाव ग्रामस्त यांच्या वतीने उत्सव साजरे केले जातात. त्यांचे सहकार्य मिळते, असे हेमदास वामन गोवारी यांनी सांगितले.