कर्जत : बातमीदार
तालुक्यातील पाली वसाहतीमधील घरात घुसून एका तरुणाने विवाहितेवर चाकूच्या सहाय्याने सहा वार केले. आरोपी डोंबिवली येथील असून नेरळ पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
नेरळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील डिकसळ (ता. कर्जत) गावाच्या पाठिमागे पाली वसाहत असून, तेथील समृद्धीहिल या गृहसंकुलातील बिल्डींग नंबर आठमध्ये लिला विनोद जैयस्वाल (वय 27) राहतात. बुधवारी (दि. 10) सायंकाळी एका तरुणाने त्यांच्या घरात घुसून धारदार चाकूच्या सहाय्याने लिला यांच्या छाती व पोटावर वार केले. त्यानंतर तो पसार झाला. जखमी लिला जैयस्वाल यांना कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या प्रकरणी नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून निरीक्षक तानाजी नारनवर अधिक तपास करीत आहेत.
मुख्याध्यापकांकडून विद्यार्थिनीचा विनयभंग; महाड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
महाड : प्रतिनिधी
रायगड जिल्हा परिषदेच्या महाड तालुक्यातील किंजळोली येथील शाळेमध्ये शिकणार्या एका 14 वर्षीय विद्यार्थिनीचा मुख्याध्यापकाने विनयभंग केल्याची घटना घडली आहे. पीडित मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून महाड शहर पोलीस ठाण्यात मुख्याध्यापका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महाड तालुक्यातील किंजळोली येथील रायगड जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये आठवी यत्तेत शिकत असलेली अनुसूचित जातीची मुलगी 5 मार्च रोजी दुपारी बारा वाजता वर्गात एकटी असताना मुख्याध्यापक पंडित महाडिक यांनी तीचा विनयभंग केला. शाळेमध्ये घडलेला सर्व प्रकार या मुलीने आपल्या पालकांच्या कानावर घातला. त्यानुसार 11 मार्च रोजी मुलीच्या आईने महाड शहर पोलीस ठाण्यामध्ये याबाबत तक्रार दाखल केली.
या प्रकरणी मुख्याध्यापका विरोधात विनयभंग तसेच पास्को अंतर्गत व अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस उपअधीक्षक निलेश तांबे करत आहेत.
सुधागडातील पडघवलीत एकास मारहाण
पाली : प्रतिनिधी
सुधागड तालुक्यातील पडघवली गावात क्षुल्लक कारणावरून एका व्यक्तीस तिघांनी लाकडी दांडक्याने जबर मारहाण केली आहे. यात जखमी झालेल्या व्यक्तीला अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी पाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुधागड तालुक्यातील पडघवली येथील हरिश्चंद्र मनवे (वय 51) यांची पत्नी अर्चना या घरासमोरील नळावरून पाणी भरत होत्या. त्यांनी पती हरिश्चंद्र यांना पाण्याचे दोन हंडे भरून देण्यास सांगितले. त्यावर पाणी भरायला मी काय बाईलबुद्या नाही, असे हरिश्चंद्र म्हणाले. यावेळी मनवे यांच्या घराच्या बाजूला लक्ष्मण लंबाटे, ज्ञानेश्वर लंबाटे व नामदेव लंबाटे पाणी भरत होते. त्यांनी, हरिश्चंद्र मनवे आपल्यालाच बाईलबुद्या म्हणाले, असा गैरसमज करून घेतला. व त्यांनी मनवे यांना शिवीगाळ करत दांडक्याने बेदम मारहाण केली. त्यात गंभीर जखमी झालेल्या हरिश्चंद्र यांच्या मुलाने त्यांना उपचारासाठी जांभूळपाडा प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले आणि त्यानंतर अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. या प्रकरणी पाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास हेड कॉन्स्टेबल जी. पी. म्हात्रे करत आहेत.
RamPrahar – The Panvel Daily Paper