Breaking News

खराब सुरुवातीचा फटका

टी-20तील पराभवानंतर कोहलीची कबुली

अहमदाबाद ः वृत्तसंस्था
टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली इंग्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेतील पहिल्या सामन्यातील पराभवाने नाराज झाला आहे. पहिल्या टी-20मध्ये भारताची सुरुवात खराब झाली होती. पीच अनुकूल असेल तर तुम्ही पहिल्या बॉलपासून आक्रमक खेळू शकता. आम्ही वेळ घेतला नाही. श्रेयसने वेळेचा योग्य वापर केला. हे पीच आमच्यासाठी नवखे होते. या पीचवर कसे खेळायचे हे आम्हाला माहिती नव्हते, अशी कबुली विराटने सामन्यानंतर दिली.
पहिल्या 10 ओव्हर संपल्यानंतर आमचे 8 फलंदाज शिल्लक असते, तर आम्ही मोठा स्कोअर करू शकलो असतो. त्यानंतर सामनाही चांगला झाला असता, असे विराटने सांगितले. आम्ही नीट फटके मारले नाहीत. एक बॅट्समन म्हणून या गोष्टीवर लक्ष द्यायला हवे. या मैदानावर कशा प्रकारे फटकेबाजी करायला हवी याचे नियोजन करायला हवे, अशी प्रतिक्रिया विराटने दिली आहे.
विराट कोहलीने या वेळी सांगितले की, आमची मालिकेची सुरुवात विचित्र झाली. या पीचवर आम्ही मनाप्रमाणे फटकेबाजी करू शकलो नाही. पीचवर असमान बाऊन्स असल्याने तुम्ही क्रिजचा योग्य वापर करायला हवा. श्रेयसला हे चांगल्या पद्धतीने समजले होते. त्याने ज्या पद्धतीने फटकेबाजी केली तशी फटकेबाजी इतरांना करता आली नाही. फलंदाजांनी खराब खेळ केला. त्याचा फटका आम्हाला बसला, अशी कबुलीदेखील कर्णधार विराट कोहलीने दिली आहे.
फॉरमॅट बदलाचा परिणाम नाही
सातत्याने कसोटी क्रिकेट खेळल्यानंतर टी-20 क्रिकेट खेळण्याचा त्रास झाला का, असा प्रश्न विराटला या वेळी विचारण्यात आला. त्यावर विराटने सांगितले की, आम्हाला फॉरमॅट बदलल्याने त्रास झाला नाही. आम्ही हे पूर्वीदेखील केले आहे. यामुळे पराभव झाला असे आम्हाला वाटत नाही. आम्ही मागच्या काही टी-20 मालिका जिंकल्या आहेत. या वर्षी होणार्‍या टी-20 वर्ल्डकपपूर्वी आमच्याकडे फक्त पाच मॅचेस आहेत. त्यामुळे आम्हाला काही गोष्टींमध्ये सुधारणा कराव्या लागतील. आम्ही कुणालाही कमी समजत नाही. इंग्लंडसारख्या मजबूत टीमला तर अजिबात नाही, असेही कर्णधार विराटने या वेळी स्पष्ट केले.

Check Also

कामोठ्यात शनिवारी ’मा. श्री. परेश ठाकूर केसरी’ भव्य कुस्त्यांचे जंगी सामने

पैलवान देवा थापा आणि नवीन चौहान यांची बिग शो मॅच होणार पनवेल ः रामप्रहर वृत्त …

Leave a Reply