संजय भोपी यांना श्रद्धांजली
पनवेल ः प्रतिनिधी
पनवेल महापालिकेची गुरुवारची (दि. 18) सर्वसाधारण सभा भाजपचे नगरसेवक तथा माजी प्रभाग समिती सभापती संजय भोपी यांना श्रद्धांजली वाहून तहकूब करण्यात आली. आता सदर सभा सोमवारी (दि. 22) घेण्यात येणार आहे.
पनवेल महापालिकेची सर्वसाधारण सभा आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात गुरुवारी सकाळी 11.30 वाजता ऑनलाइन सुरू झाली. या वेळी सभागृहात महापौर डॉ. कविता चौतमोल, स्थायी समिती सभापती संतोष शेट्टी, महिला व बालकल्याण सभापती मोनिका महानवर आणि प्रभाग समिती सभापती, विरोधी पक्षाचे नगरसेवक गणेश कडू, आयुक्त सुधाकर देशमुख, अतिरिक्त आयुक्त सांडभोर आदी उपस्थित होते.
स्थायी समिती सभापती संतोष शेट्टी यांनी नगरसेवक तथा माजी प्रभाग समिती सभापती संजय भोपी यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त करून सभा स्थगित करण्याची मागणी केली. प्रकाश बिनेदार यांनी त्याला अनुमोदन दिल्यावर सभा तहकूब करण्यात आल्यानंतर नगरसेवकांनी दिवंगत संजय भोपी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.
महिला नगरसेवकांना ताई म्हणून आदराने हाक मारणारा तसेच मनमिळावू नगरसेवक अखेर मृत्यूशी झुंज हरल्याने आपल्यातून निघून गेला. मी त्यांना पाहायला बॉम्बे हॉस्पिटलमध्ये गेले तेव्हा डॉक्टर असूनही काही क्षण थिजून गेले इतका त्रास ते सहन करीत होते. नंतर यातून ते बाहेर आले होते. त्यावेळी ते बरे होतील अशी आशा आम्हाला होती. त्यामुळे त्यांच्या निधनाचा फोन आल्यावर विश्वासच बसला नाही. त्यांच्या कुटुंबाला या
दुःखातून सावरण्याची शक्ती मिळो.
-डॉ. कविता चौतमोल, महापौर, पनवेल मनपा
नगरसेवक संजय भोपी पनवेल महापालिकचे एक जबरदस्त तडफदार व्यक्तिमत्त्व तसेच
तरुणांचे लाडके होते. खांदा कॉलनीतील नगरसेवक संजय
भोपीजी यांचे नुकतेच दुखद निधन झाले. त्यांच्या जाण्याने मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
-परेश ठाकूर, सभागृह नेते, पनवेल मनपा
नगरसेवक संजय भोपी यांच्या निधनाची बातमी आल्यावर पालिकेत आणि सदस्यांत दुःखाचे वातावरण पसरले. ते एक चांगले सदस्य होते. सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील सदस्यांमध्ये त्यांच्याविषयी आदर होता. हा आदर मिळवणे सोपे नसते. अशा प्रकारची व्यक्ती आपल्यामधून जाते तेव्हा समाजाचे फार मोठे नुकसान होते.
-सुधाकर देशमुख, आयुक्त, पनवेल मनपा
आज खरोखरंच एक चांगला मित्र आपल्यातून निघून गेला आहे. आधी मुग्धाताई आणि आता संजय भोपी यांचे अकस्मात निधन झाले. त्यांच्या स्मरणार्थ महापालिकेने आरोग्यसंदर्भात एखादा कार्यक्रम राबवावा, अशी मी विनंती करतो.
-प्रीतम म्हात्रे, विरोधी पक्षनेते, पनवेल मनपा
संजय भोपी म्हणजे मनमिळावू दुसर्याच्या सुखदुखात सहभागी होणारा, सर्वसामान्यांना बरोबर घेऊन जाणारा कार्यकर्ता. दातृत्वाने आणि कर्तृत्वानेही तो मोठा होता. कोरोनामध्ये लोकसेवेला झोकून दिलेला माणूस दुसर्यांना वाचवता वाचवता बळी पडला. मरावे परी कीर्तिरूपे उरावे असे हे व्यक्तिमत्त्व होते.
डॉ. अरुणकुमार भगत, नगरसेवक
भाजपचा निष्ठावंत व निस्वार्थी कार्यकर्ता, लोकनेते रामशेठ ठाकूर व आमदार प्रशांत ठाकूर यांच्यावर निष्ठा ठेवून काम करणारा कार्यकर्ता आपल्यातून निघून गेला. लोकांच्यात राहून लोकांसाठी काम करणारे व्यक्तिमत्व आज हरपले. त्यामुळे खांदा कॉलनीतील त्यांचे कार्यकर्ते, कुटुंबच नव्हे, तर भारतीय जनता पक्षाचेही मोठे नुकसान झाले आहे.
-अॅड. मनोज भुजबळ, नगरसेवक
संजय भोपी यांना 12 डिसेंबरला मोरे हॉस्पिटलमध्ये दाखल केले. त्यानंतर 13 डिसेंबरला अपोलो हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तेथे उपचार करताना हलगर्जीपणामुळे त्यांना इन्फेक्शन झाले. 20 दिवसांनंतर आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विनंतीवरून त्यांना बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तेथे उपचार सुरू असताना त्यांची प्रकृती खालावली होती. तेथील उपचारानंतर त्यांची प्रकृती सुधारत होती, पण दैवापुढे कोणाचेच चालत नाही हेच खरे.
-मनोहर म्हात्रे, नगरसेवक
संजय भोपी यांच्याबरोबर काम करताना चांगला अनुभव आला. कालची गर्दी पाहून त्यांचे व्यक्तिमत्त्व किती लोकप्रिय होते याची कल्पना येते. त्यांना मी माझ्या कुटुंबाच्या आणि शेकापच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो.
-गणेश कडू, नगरसेवक, शेकाप
सर्वांचे आवडते, सर्वांसाठी झटणारे, कोरोना काळात झोकून देऊन काम करणारे संजय भोपी यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
-चारुशीला घरत, नगरसेविका
खांदा कॉलनीतील कर्तृत्ववान नगरसेवक आणि नेहमी मला माझी चूक झाली तर दाखवून देणारा मित्र संजय भोपी मी गमावला.
-सतीश पाटील, नगरसेवक, राष्ट्रवादी काँग्रेस
या वेळी प्रकाश बिनेदार, अरविंद म्हात्रे, मोनिका महानवर, तेजस कांडपिळे, समीर ठाकूर, शंकर म्हात्रे, हेमलता म्हात्रे, अजय बहिरा, प्रभाग ‘ड’ अध्यक्ष सुशीला घरत, गोपाळ भगत, हरेश केणी, अनिता पाटील, संतोषी तुपे, दर्शना भोईर, मुकीत काझी, सुरेखा मोहकर यांचीही श्रद्धांजलीपर भाषणे झाली.
RamPrahar – The Panvel Daily Paper