भाजपचे सुनील गोगटे यांचा केंद्रीय अर्थराज्यमंत्र्यांकडे पाठपुरावा
कर्जत ः प्रतिनिधी, बातमीदार
पेण को. अर्बन बँक 10 वर्षांपूर्वी बंद झाली. त्यामुळे लाखो ठेवीदारांचे पैसे अडकून पडले आहेत. त्या पार्श्वभूमीवर किसान मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस सुनील गोगटे यांनी केंद्रीय अर्थराज्यमंत्री अनुराग ठाकूर यांची भेट घेऊन पेण को. अर्बन बँकेचे एखाद्या मोठ्या बँकेत विलीनीकरण करून ठेवीदारांचे पैसे परत द्यावेत, अशा मागणीचे निवेदन दिले. त्याला सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच आढावा घेऊन कार्यवाही करू, असे आश्वासन अर्थराज्यमंत्र्यांनी दिले आहे.
पेण को. अर्बन बँक बंद झाल्यामुळे ठेवींच्या रूपाने असलेले अनेकांचे पैसे अडकले. जिल्ह्यात एकूण एक लाख 68 हजार 480 खातेदार आहेत. त्यांचे 611 कोटी 37 लाख रुपये यामध्ये गुंतले आहेत. यातून मार्ग निघावा म्हणून अनेक जण आपापल्या परीने प्रयत्न करीत आहेत. त्या अनुषंगाने भारतीय जनता पक्ष किसान मोर्चाचे प्रदेश चिटणीस सुनील गोगटे यांनी नुकतीच नवी दिल्ली येथे केंद्रीय अर्थराज्यमंत्री अनुराग ठाकूर यांची भेट घेऊन पेण को. ऑप. अर्बन बँकेचे मोठ्या बँकेत विलीनीकरण करावे किंवा बँकेच्या सर्व मालमत्ता, जागा विकून ठेवीदारांना लवकरात लवकर पैसे परत द्यावेत, अशी मागणी निवेदनाद्वारे दिली.
या वेळी खासदार रामदास तडस, माजी कृषिमंत्री तथा किसान मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष अनिल बोंद्रे उपस्थित होते. या प्रकरणी लवकरच आढावा घेऊन कार्यवाही करू, तसेच सर्व दोषींवर कारवाई करून ठेवीदारांना न्याय देऊ, असे आश्वासन केंद्रीय अर्थराज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी या वेळी दिले.