मुंबई ः प्रतिनिधी
महाराष्ट्राच्या राजकीय खेळपट्टीवर सध्या परमबीर सिंह यांचा लेटरबॉम्ब आणि रश्मी शुक्ला यांचे फोन टॅपिंग या मुद्द्यांवरून तुफान सामना रंगताना पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्ताधार्यांवर अनेक आरोप केले असताना गुरुवारी (दि. 25) त्यांनी क्रिकेटच्या भाषेत सत्ताधार्यांवर निशाणा साधला. वडाळा विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार कालिदास कोळंबकर यांच्या वतीने आयोजित आमदार चषक क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी त्यांनी फलंदाजी करीत फटके लगावले, तसेच पत्रकारांशी बोलतानाही राजकीय फटकेबाजी केली. सध्याच्या परिस्थितीत इतके लूज बॉल मला मिळत आहेत की, ते बॉल मला सीमारेषेपार पाठवावेच लागतील, असे ते म्हणाले. ‘क्रिकेटमध्ये बॅटिंग करायला मिळाली की मजा येते. मी लहानपणी क्रिकेट खेळायचो, तेव्हा बॅटिंगही करायचो आणि बॉलिंगही करायचो. फिल्डींग क्वचित करायचो. पण जेव्हा फिल्डींग करायचो, तेव्हा माझ्याकडून कॅच कधीच सुटायचा नाही, पण आता माझे ठरलेय, मी वेगवान बॉलिंगही करणार आहे, गुगलीही टाकणार आहे आणि बॅटिंगला येईन तेव्हा शॉट्सदेखील खेळणार आहे,’ अशी फटकेबाजी फडणवीस यांनी केली. या वेळी फडणवीस यांनी सत्ताधार्यांवर खोचक टिप्पणी केली. मला हल्ली सर्व लूज बॉल येत आहेत. ते मला सीमारेषेपार पाठवावेच लागतील आणि बॉलिंगचे बोलायचे, तर मी बॉडीलाइन बॉलिंग करत नाही. मी अतिशय लॉजिकल, ऑन द स्टम्प बॉलिंग करतो. त्यामुळे समोरच्यांना बॅटिंग करताना अडचण होते, असे ते म्हणाले. शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केलेल्या शरद पवारांनी यूपीचे नेतृत्व करावे या मागणीवरदेखील फडणवीसांनी खोचक टोमणा मारला. यूपीएचा कॅप्टन बदला हे सोळावा गडी म्हणतोय. त्याच्या म्हणण्यानुसार कोण कॅप्टन हे ठरत नसते. त्यासाठी टीममध्ये असायला लागते. टीमच्या बाहेरच्या माणसाने ते सांगून काही फायदा नसतो, असे ते म्हणाले. राज्यात गेल्या काही दिवसांपासून एकापाठोपाठ एक उघडकीस आलेल्या विविध प्रकरणांवरून विरोधी पक्षनेते फडणवीस आक्रमक झाले असून, गुरुवारी त्यांनी प्रत्यक्ष मैदानावर तसेच पत्रकारांशी बोलताना शाब्दिक फटकेबाजी करून ठाकरे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.
रश्मी शुक्ला प्रकरणावर सवाल
या वेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी रश्मी शुक्ला प्रकरणावरून राज्य सरकारला सवाल केला. चौकशी कुणाची करायला हवी ज्यांनी चोरी पकडली त्यांची? की, ज्यांनी चोरी केली त्यांची? ज्यांनी चोरी केली त्यांना आम्ही मोकाट सोडू आणि का पकडले याकरिता आम्ही चौकशी करू हा या सरकारचा न्याय आहे. यातूनच हे सरकार कुणाला पाठीशी घालतेय हे स्पष्ट दिसते. जे संभाषण झालेय, जे व्यवहार झालेत, जे रॅकेट झालेय त्यावर कारवाई करण्याची मानसिकता या सरकारची नाही, अशी टीका फडणवीसांनी केली. एखाद्या महिला ऑफिसरला टार्गेट करताना आपण काही मर्यादा ठेवतो का हे पाहिले पाहिजे, पण जे बोलले आहेत, त्यांच्याकडून मर्यादेचा विचार करणेच मूर्खपणाचे आहे, असेदेखील फडणवीस म्हणाले.
RamPrahar – The Panvel Daily Paper