मुंबई ः प्रतिनिधी
केंद्राकडे बोट दाखवून आपले अपयश झाकायचे काम राज्य सरकार करीत आहे, अशी टीका खासदार नारायण राणे यांनी शुक्रवारी (दि. 9) पत्रकार परिषदेत केली. जेवढे दिवस आहेत तेवढे दिवस जनतेचे शोषण करण्याचा एककलमी कार्यक्रम या सरकारचा सुरू आहे. सर्व ठिकाणी भ्रष्टाचार सुरू आहे, असा आरोपही त्यांनी या वेळी केला.
नारायण राणे म्हणाले, महाराष्ट्रात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. कोरोना संसर्ग वाढत असताना त्यावर उपाययोजना करायला हा महाराष्ट्र कमी पडला आहे. अन्य राज्यांच्या तुलनेत रुग्णांची संख्या वाढत आहे, मृत्यूंची संख्या वाढत आहे. याचे गांभीर्य राज्य सरकारला नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व आरोग्यमंत्री राजेश टोपे हे केंद्राकडे बोट दाखवत आहेत. राज्यात डॉक्टर्स नाही, बेड्स नाही, नर्स नाही ही कोणाची जबाबदारी आहे? जसे माझे कुटुंब माझी जबाबदारी, तसे महाराष्ट्र तुमचे कुटुंब असेल तर या सर्व गोष्टी उपलब्ध करणे, रुग्णांवर उपचार योग्य प्रकारे करणे, त्यांना बरे करणे ही तुमची तुमची जबाबदारी नाही का? पिंजर्यात काय जाऊन बसत आहात, स्वतःला लॉकडाऊन करून घेतले आहे. ‘मातोश्री’च्या बाहेर पडत नाही मग कोरोना होईल कसा? माझे कुटुंब माझी जबाबदारी असताना कुटुंबातील सगळी लोकं रुग्णालयात कसे? म्हणजे कुटुंब सांभाळू शकत नाही तो व्यक्ती महाराष्ट्र व कोरोनाबाधित रुग्णांना कसं सांभाळणार? हे अपयश आहे. कोरोना हाताळायला हे सरकार कमी पडले आहे. केंद्राकडे का बोट दाखवता?
सचिन वाझेला मुंबईतून 100 कोटी जमा करायला सांगितले हे आदेश केवळ अनिल देशमुख यांचे नाहीत. यामध्ये सगळे राज्याचे प्रमुख सहभागी आहेत. मग तुम्ही जमा केलेले पैसे, लसीसाठी का नाही वापरत? ते कुठे जातात? कोणाकडे जातात? याबद्दल काहीतरी सांगा. मग बेड नाही, व्हेंटिलेटर्स नाहीत, असे सांगितले जाते. वॉर्ड बॉय, नर्स, डॉक्टर्स यांची भरती कोणी करायची, असा सवालदेखील राणेंनी या वेळी उपस्थित केला.
Check Also
पनवेल महापालिकेच्या नूतन महापौर निवासस्थानाचे लोकार्पण
पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिकेच्या वतीने खारघर येथील सेक्टर २१मध्ये उभारण्यात आलेल्या ‘शिवनेरी’ या भव्य …
RamPrahar – The Panvel Daily Paper