Breaking News

केंद्रीय पथकाकडून रायगडात पाहणी; कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा घेतला आढावा

अलिबाग : जिमाका

वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनांची तसेच आरोग्य यंत्रणेची पाहणी करण्यासाठी केंद्र शासनाच्या द्विसदस्यीय पथकाने शुक्रवारी (दि. 9) जिल्हा सामान्य रुग्णालयाला भेट दिली. डॉ. साहिल दिवाण व डॉ. प्रवीण हे या पथकाचे सदस्य होते. या वेळी जिल्हाधिकारी निधी चौधरी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुहास माने, अति. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अनिल फुटाणे, डॉ. गवई, डॉ. गजानन गुंजकर, डॉ. हुलवान, डॉ. पोटे, डॉ. दिपाली राजपूत, मेट्रन श्रीमती मोरे, सिस्टर इन्चार्ज कामिनी पाटील, डॉ.पुरुषोत्तम जयस्वाल, जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. जगताप, डॉ.शीतल जोशी-घुगे, डॉ. फरहाना, लस शीतसाखळी नियंत्रण व्यवस्थापक श्री. सूर्यवंशी, भांडार व्यवस्थापक विकास पाटील यांची उपस्थिती होती. केंद्र शासनाच्या या पथकाने कोविडच्या पार्श्वभूमीवर जिल्हा सामान्य रुग्णालयातील सर्व सोयी-सुविधांचा तसेच कोरोना प्रतिबंधक उपाययोजना राबविण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून जे नियोजन केले जाते, त्याचाही आढावा घेतला. शिवाय जिल्ह्याचे क्षेत्रफळ, तालुक्यांची संख्या, जिल्ह्यातील उपजिल्हा रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, ऑनलाइन डेटा फिडिंग प्रणाली, उपलब्ध मनुष्यबळ या विषयीची माहिती घेतली. या पथकाने जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या आवारातील आरटीपीसीआर लॅब, ऑक्सिजन टँक, अतिदक्षता विभाग, लसीकरण केंद्र, जिल्हा लस भांडार शीतकक्ष या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देवून तेथील कामकाज पद्धतीचे निरीक्षण केले. याशिवाय जिजामाता रुग्णालयातील कोविड हेल्थ सेंटरचीही या पथकाने पाहणी केली. जिल्हाधिकारी निधी चौधरी व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुहास माने यांनी त्यांना याविषयी अधिक सविस्तर माहिती दिली. भेटीअंती या पथकाने मास्क वापरणे, सॅनिटायझरचा वापर करणे, हात वारंवार स्वच्छ धुणे, सोशल डिस्टन्सिंग पाळणे, या चतु:सूत्रीचे नागरिकांनी पालन करण्याचे आवाहन केले.

Check Also

गिरवलेचे सरपंच प्रताप हातमोडे भाजपमध्ये दाखल

पनवेल : रामप्रहर वृत्तगिरवले गावचे सरपंच प्रताप चंद्रकांत हातमोडे यांच्यासह त्यांच्या समर्थकांनी भारतीय जनता पक्षामध्ये …

Leave a Reply