Breaking News

कोरोनाबाधित मृतांच्या अंत्यसंस्काराचा खर्च महापालिकेमार्फत करण्यात यावा : परेश ठाकूर

पनवेल ः रामप्रहर वृत्त
कोरोनाबाधित मृत पावलेल्या व्यक्तींच्या अंत्यसंस्कारासाठी लागणारा खर्च पनवेल महानगरपालिकेमार्फत करण्यात यावा, अशी मागणी व स्मरणपत्र सभागृह नेते परेश ठाकूर यांनी आयुक्त सुधाकर देशमुख यांना दिले आहे.
या संदर्भात सभागृह नेते परेश ठाकूर यांनी दिलेल्या स्मरणपत्रात म्हटले आहे की, सध्या देशभर सर्वत्र कोरोना (कोविड-19) या विषाणूचा प्रादुर्भाव वाढलेला असून, या विषाणूची लागण नागरिकांना होऊ नये याकरिता केंद्र सरकार शर्थीचे प्रयत्न करीत आहेत. कोरोना विषाणूची लागण अन्य व्यक्तींना होऊ नये यासाठी पनवेल महापालिका प्रशासनामार्फत योग्य ती उपययोजना करण्याचे कार्य करण्यात येत आहे. त्याचबरोबर कोरोना आजारात मृत पावलेल्या व्यक्तीचे अंत्यसंस्कार शासनाचे नियमाचे पालन करून केले जातात, परंतु लाकडावर कोरोनाबाधित व्यक्तीचा मृतदेह जाळताना मृताच्या नातेवाइकांकडून अंत्यविधीकरिता किमान सहा ते सात हजार रुपये घेतले जात असल्याचे दिसून आले होते. त्याचप्रमाणे नातेवाइक बहुतांश वेळी होम क्वारंटाइन असल्याने त्यांना मृत व्यक्तीच्या अंत्यविधीसाठी येता येत नाही, तसेच कोरोनाबाधित मृत पावलेल्या व्यक्तींच्या अंत्यसंस्कारासाठी लागणारा खर्च हा गरीब कुटुंबीयांना परवडण्याजोगा नसल्याने नातेवाइकांना त्याचा त्रास सहन करावा लागतो.
कोरोनाबाधित मृत पावलेल्या व्यक्तींच्या अंत्यसंस्कारासाठी लागणारा खर्च पनवेल महापालिका प्रशासनामार्फत मोफत केल्यास मृत व्यक्तीच्या नातेवाइकांना दिलासा मिळेल व त्यांना आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागणार नाही. याबाबत 10 सप्टेंबर 2020 रोजी (जावक क्रमांक 187) पत्रव्यवहार केला असून, अद्यापपर्यंत त्यावर कोणत्याही प्रकारची उपाययोजना करण्यात आली नसल्याचे दिसते. त्याचबरोबर अजूनही कोरोनाबाधित व्यक्तीचा मृतदेह जाळताना नातेवाइकांकडून अंत्यविधीकरिता किमान 2500 ते 5000 रुपये घेतले जात असल्याचे दिसून आले आहे. या विषयाचे गांभीर्य लक्षात घेता पनवेल महापालिका प्रशासनामार्फत कोरोनाबाधित मृत पावलेल्या व्यक्तींच्या अंत्यसंस्कारासाठी लागणारा खर्च करण्याकरिता तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश संबंधित विभागाच्या आधिकारीवर्गाला देण्यात यावेत, असे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी आयुक्त सुधाकर देशमुख यांना दिलेल्या निवेदनात अधोरेखित केले आहे.

Check Also

25 एकांकिका राज्यस्तरीय अटल करंडक स्पर्धेच्या अंतिम फेरीत दाखल

पनवेल : रामप्रहर वृत्तश्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य …

Leave a Reply