आमदार प्रशांत ठाकूर यांची मंत्री राजेंद्र शिंगणे यांच्याकडे मागणी
पनवेल ः रामप्रहर वृत्त
रायगड जिल्ह्यातील विशेषतः पनवेल महानगरपालिका हद्दीतील कोविड रुग्णांना उपचारासाठी अत्यावश्यक असणारे रेमडेसिवीर इंजेक्शन सहजरित्या मिळावे याकरिता नेमणूक केलेल्या घाऊक विक्रेत्यांना ते उपलब्ध करून देण्याची तातडीने कार्यवाही व्हावी, अशी मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी राज्याचे अन्न व औषधे प्रशासनमंत्री राजेंद्र शिंगणे यांच्याकडे केली आहे. या संदर्भात त्यांनी निवेदन दिले आहे.
या निवेदनात आमदार प्रशांत ठाकूर यांनी म्हटले आहे की, रायगड जिल्ह्यातील विशेषतः पनवेल महापालिका हद्दीतील कोविड रुग्णांची संख्या पाहता कोविड रुग्णांना अत्यावश्यक असणारे रेमडेसिवीर इंजेक्शन डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालय तसेच शासनाने मान्यता दिलेल्या कोविड सेंटरमध्ये पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसल्याने अनेक रुग्णांच्या नातेवाइकांना या औषधासाठी जास्त पैसे मोजून काळाबाजारातून खरेदी करावे लागत आहे. कित्येक वेळा इतर ठिकाणी रेमडेसिवीर इंजेक्शन न मिळाल्यामुळे अनेक रुग्णांना आपला प्राण गमवावा लागला आहे.
अशातच कोविड रुग्णांना हे औषध प्राप्त करून देण्यासाठी कोविड रुग्णालयांनी रेमडेसिवीर औषध साठा प्राप्त करून घेण्यासाठी रुग्णालयाच्या लेटरहेडवर सही शिक्क्यानिशी प्राधिकारपत्र व प्राधिकृत व्यक्तीचे फोटो ओळखपत्र घाऊक विक्रेत्याकडे सादर करणे आवश्यक असून, याबाबतची खातरजमा करून घाऊक विक्रेत्यांनी औषधाचे सुयोग्य वितरण आदेश संदर्भीय पत्राने रायगड जिल्हाधिकार्यांनी दिले आहे. हे आदेश पाहता कोविड रुग्णांना उपचारासाठी लागणारे रेमडेसिवीर इंजेक्शन तातडीने मिळण्याची अत्यंत गरज असताना या आदेशाची अंमलबजावणी करताना कोविड सेंटरना रेमडेसिवीर इंजेक्शन मिळण्यास विलंब होऊन अनेक
कोविड रुग्ण दगावण्याची शक्यता बळावली आहे, याकडे आमदार प्रशांत ठाकूर यांनी लक्ष वेधले आहे.
दररोज जिल्ह्यातील निरनिराळ्या विक्रेत्यांना रेमडेसिवीर औषधे पाठवली जातात व त्यांच्यामार्फत ती रायगड जिल्ह्यातील कोविड रुग्णांवर उपचार करण्यासाठी मान्यता मिळालेल्या रुग्णालयांना प्रत्यक्ष जाऊन स्वीकारावी लागतात. गेल्या काही दिवसांत पनवेल परिसरातील रुग्णालयांना अशी औषधे अलिबाग, महाड येथे जाऊन आणावी लागली आहेत. प्रत्येक रुग्णालयाच्या प्रतिनिधीला तासन्तास प्रवासात खर्चून ही औषधे आणताना वेळ, पैसा सगळ्याचाच अपव्यय होत आहे. मुंबई, नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील मध्यवर्ती ठिकाण म्हणून पनवेल येथे जिल्ह्यातून मोठ्या संख्येने कोविड रुग्ण उपचारासाठी दाखल होत आहेत. कोविड रुग्णांना उपचारासाठी लागणारे रेमडेसिवीर इंजेक्शन मोठ्या प्रमाणात पनवेलमधील घाऊक विक्रेत्यांकडेच मिळणे आवश्यक असताना पनवेल परिसरातील कोविड रुग्णालयांना हे औषध उपलब्ध करताना विलंब होऊन अनेक अडचणींना सामोरे जावे लागणार आहे. औषध उपलब्ध नसल्याने रुग्णांच्या नातेवाइकांना जास्त रक्कम देऊन इंजेक्शन विकत घ्यावे लागल्यामुळे काळाबाजार करणार्यांना आयती संधी मिळणार आहे. या वस्तुस्थितीचे गांर्भीय लक्षात घेता रायगड जिल्हाधिकार्यांनी काढलेल्या आदेशाचे फेरविचार करून पनवेल महापालिका हद्दीतील कोविड रुग्णांना रेमडेसिवीर इंजेक्शन सहजरित्या कोविड रुग्णालयात उपलब्ध होण्यासाठी पनवेल परिसरातील घाऊक विक्रेत्यांना वितरण करण्यास उपलब्ध करून देण्याबाबत आपणामार्फत तातडीने कार्यवाही व्हावी, असे आमदार प्रशांत ठाकूर यांनी निवेदनात म्हटले आहे, तसेच या संदर्भातील निवेदन अन्न व औषधे प्रशासन विभागाचे सचिव सौरभ विजय, अन्न व औषधे प्रशासन विभाग आयुक्त यांनाही दिले आहे.