Breaking News

उल्हास नदीवर पर्यटकांची गर्दी

जमावबंदी आदेशाकडे दुर्लक्ष; स्थानिकांत नाराजी

कर्जत ः बातमीदार

कर्जत तालुक्यातून वाहणार्‍या उल्हास नदीच्या किनार्‍यावर सध्या संध्याकाळच्या वेळी तुडूंब गर्दी होत आहे. शासनाने वीकेण्ड लॉकडाऊनमध्ये संचारबंदी लावली, तसेच लॉकडाऊनमध्ये जमावबंदी लावून कडक निर्बंध जारी केले आहेत. दरम्यान, अशा वेळीही लोक घराबाहेर पडत असताना प्रशासनाकडून योग्य ती कारवाई होत नसल्याबद्दल स्थानिकांत नाराजी व्यक्त होत आहे.

कर्जत तालुक्यातून वाहणारी उल्हास नदी पुढे वाकस, कोल्हारे, भाकरीपाडा, तळवडे, धामोते, हंबरपाडा, दहिवली, मालेगाव अशी नेरळ, ममदापूर, भडवळ, शेलू, बदलापूर आदी भागांतून पुढे कल्याणला खाडीत जाऊन मिळते. उल्हास नदी ही बारमाही वाहणारी नदी आहे. उन्हाळ्यात सायंकाळी उल्हास नदीच्या या सर्व ठिकाणी लोकांची गर्दी असते. पाण्यात पोहणे, नदीतिरावर पाण्यात खेळणे आदी उद्योग त्यांच्याकडून होत आहेत.  

या वेळी सामाजिक अंतर राखणे, मास्क घालणे आदी नियम आणि मुख्य म्हणजे जमावबंदी तसेच वीकेण्ड संचारबंदीकडे लोकांनी डोळेझाक केल्याचे दिसून येते, मात्र प्रशासनाला शासनाने सर्व अधिकार दिले असताना माणसे रस्त्यावर उतरतातच कशी, असा प्रश्न निर्माण होत आहे.

कोरोना महामारीमुळे देशात सर्वत्र भीतीचे वातावरण असताना कर्जत तालुक्यात मात्र बेफिकीरपणे लोकांचे घराबाहेर पडणे सुरूच आहे. कोरोनाचा फैलाव आणि मृत्यूचे प्रमाण समोर असतानादेखील अशी स्थिती कर्जत तालुक्यातील उल्हास नदीवर विविध ठिकाणी पाहायला मिळत असल्याने प्रशासन काय करते आणि लोकांनी काय ठरविले आहे, असा प्रश्न पडत आहे.

शासनाच्या आदेशाप्रमाणे लोकांनी आपली जबाबदारी समजून या महामारीपासून आपले आणि आपल्या समाजाचे रक्षण केले पाहिजे, पण लोक नवनवीन मार्ग शोधून बाहेर पडत आहेत. त्याबद्दल आम्ही अहवाल सादर केला आहे. आदेश आल्यास कारवाई सुरू केली जाईल.

-तानाजी नारनवर, पोलीस निरीक्षक, नेरळ पोलीस ठाणे

आम्ही ग्रामपंचायतीतर्फे दहिवली उल्हास नदीच्या तिरावर फलक लावला आहे. त्यानुसार पोलीस प्रशासनाकडे ग्रामपंचायतीच्या वतीने पत्रव्यवहार करून त्यांच्या मदतीने नियमांचा भंग करणार्‍या नागरिकांवर पोलिसांनी दंडात्मक कारवाई करायला हवी.

-यशवंत भवारे, माजी उपसरपंच, दहिवली ग्रामपंचायत

यंदा कोरोनाची दुसरी लाट तीव्र आहे, परंतु तरीसुद्धा आताही जमावबंदी, संचारबंदीसारखे नियम मोडत नागरिक नदीवर पिकनिक साजरी करायला येतात. कर्जत तालुक्यात वाढत्या कोरोना संक्रमणाच्या काळात या गोष्टी चुकीच्या आहेत.

-केशव तरे, कार्यकर्ते, उल्हास नदी बचाव समिती

Check Also

जितेंद्रशी आपला ‘परिचय’ असादेखील…

2001च्या मे महिन्यातील गोष्ट. तुषार कपूरचा रुपेरी पडद्यावरील पदार्पणातील ‘मुझे कुछ कहना है’च्या पूर्वप्रसिद्धीत रंग …

Leave a Reply