Breaking News

आयपीएलला मोठा धक्का

इंग्लंडपाठोपाठ न्यूझीलंड खेळाडूंचीही  स्पर्धेकडे पाठ

मुंबई ः प्रतिनिधी

आयपीएलला आता अजून एक मोठा धक्का बसला आहे. कारण यापूर्वी इंग्लंडच्या क्रिकेट मंडळाने आमचे खेळाडू आयपीएल खेळू शकत नाहीत, असे स्पष्ट केले होते. त्यानंतर आता न्यूझीलंडचे खेळाडूही आयपीएलचे सामने खेळू शकणार नसल्याचे समोर आले आहे.

आयपीएलचे आतापर्यंत 29 सामने झाले आहेत. आयपीएलचे उर्वरित सामने सप्टेंबर महिन्यात होऊ शकतात, असे म्हटले जात आहे. त्यामुळे आता आयपीएलमध्ये इंग्लंडपाठोपाठ न्यूझीलंडचे खेळाडूही खेळणार नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे आयपीएलमध्ये आता न्यूझीलंड हा दुसरा देश ठरला आहे, ज्या देशाचे खेळाडू स्पर्धेत खेळू शकणार नाहीत.

आयपीएल सप्टेंबर महिन्यात खेळवण्याचे ठरवले जात आहे, पण त्याच वेळी न्यूझीलंडचा संघ हा यूएईमध्ये जाणार आहे. या वेळी न्यूझीलंडचा संघ पाकिस्तानबरोबर दोन मालिका खेळणार आहे. न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यामध्ये सप्टेंबर महिन्यात तीन वन डे आणि तीन टी-20 सामन्यांच्या मालिकांचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा आयसीसीने मान्य केली आहे. त्यामुळे स्पर्धा रद्द करता येणार नाही. त्यामुळे न्यूझीलंडच्या खेळाडूंना यूएईमध्ये खेळावे लागणार आहे. मुंबई इंडियन्सचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट, सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार केन विल्यम्सन आता आयपीएलचे सप्टेंबरमध्ये सामने झाले तर खेळू शकणार नाहीत. त्यामुळे आयपीएलसाठी हा एक मोठा धक्का मानला जात आहे.

इंग्लंडचा संघ 16 सप्टेंबरला बांगलादेशच्या दौर्‍यासाठी रवाना होणार आहे. या दौर्‍यात इंग्लंडचा संघ मर्यादित षटकांचे सहा सामने खेळणार आहे. त्यानंतर ऑक्टोबर महिन्यात इंग्लंडचा संघ पाकिस्तानच्या दौर्‍यावर जाणार आहे. इंग्लंडचा संघ 16 वर्षांमध्येच प्रथमच पाकिस्तानच्या दौर्‍यावर जाणार आहे. त्यानंतर इंग्लंडचा संघ भारतामध्ये टी-20 विश्वचषक खेळायला येणार आहे. विश्वचषक संपल्यावर इंग्लंडचा संघ अ‍ॅशेस मालिकेची तयारी करण्यासाठी ऑस्ट्रेलियाला रवाना होणार आहे. अ‍ॅशेस मालिका 8 डिसेंबरपासून सुरू होणार आहे.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply