अष्टपैलू खेळाडूसाठी शार्दूल ठाकूरचा पर्याय
मुंबई ः प्रतिनिधी
भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याला मोठा धक्का बसला आहे. कारण हार्दिकच्या जागी आता संघाला शार्दूल ठाकूरच्या रूपाने एक चांगला अष्टपैलू खेळाडू सापडल्याचे आता प्रशिक्षकांनीच सांगितले आहे. त्यामुळे आता लवकरच हार्दिक पांड्याचा संघातील पत्ता कट होऊ शकतो असे दिसत आहे.
हार्दिक अष्टपैलू खेळाडू असला तरी गेले काही महिने तो गोलंदाजी करताना दिसला नाही. त्यामुळे हार्दिक आता अष्टपैलू खेळाडू नाही, तर एक फलंदाज उरला आहे, अशी चर्चा चाहत्यांमध्ये आहे. हीच गोष्ट कुठेतरी भारताच्या संघालाही जाणवते. त्यामुळे हार्दिकच्या जागी संघाला एक चांगला अष्टपैलू खेळाडू सापडल्याचे वक्तव्य प्रशिक्षकांनीच केले आहे.
भारताचे गोलंदाजी प्रशिक्षक भारत अरुण यांनी सांगितले की, पाठीच्या दुखण्यामुळे हार्दिक गोलंदाजी करताना दिसत नाही, पण भारतीय संघातील शार्दूल ठाकूर एक उपयुक्त अष्टपैलू खेळाडू म्हणून समोर आलाय. चांगल्या गोलंदाजीसह तो उपयुक्त फलंदाजीही करू शकतो. त्यामुळे शार्दूल चांगला अष्टपैलू खेळाडू म्हणून समोर आला आहे.
अरुण यांनी पुढे सांगितले की, निवड समिती खेळाडू निवडण्याचे काम करते. त्यानंतर संघात आल्यावर खेळाडूवर आम्ही योग्य संस्कार करतो, पण माझ्या मते शार्दूलने एक गोष्ट सिद्ध केली आहे आणि ती म्हणजे तो एक चांगला अष्टपैलू खेळाडू आहे. ऑस्ट्रेलियात त्याने चमकदार कामगिरी केली. त्यामुळे त्याच्यावर सर्वांचे लक्ष असेल.