Breaking News

नवी मुंबईत कोरोना मृत्यूदर नियंत्रणात

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत नवी मुंबईतील कोरोना मृत्यूदर हा भरपूर चिंता देत होता, परंतु वाढता कोरोनामुक्तीचा दर आणि कडक निर्बंध यामुळे कोरोनाचा मृत्यूदर कमी होत आहे. पहिल्या लाटेपेक्षा आताचा मृत्युदर हा कमी असला तरी दैनंदिन मृत्यू हे अधिक असल्याने ही चिंता प्रशासनापुढे कायम आहे. शहरात कोरोनाच्या दुसर्‍या लाटेने पहिल्या लाटेतील सर्व उच्चांक मोडीत काढले. यात दैनंदिन रुग्णसंख्या 4 एप्रिल रोजी 1441 पर्यंत गेल्याने संकट निर्माण झाले होते. त्यानंतर शहरातील कोरोना संसर्ग नियंत्रणात येत दैनंदिन रुग्णसंख्या जशी वाढली तशी झपाट्याने कमी होत गेली. आता दिवसाला नवे रुग्ण हे 150 ते 200 च्या घरात आहेत. प्रतिबंधित क्षेत्राची प्रभावी अंमलबजावणी व संसर्ग साखळी तोडण्यावर भर देण्यात आला. तसेच शासनाने कडकडीत संचारबंदी लागू केल्याने ही परिस्थिती नियंत्रणात आली. 50 वर्षांवरील कोरोना रुग्ण गृहविलगीकरणात न ठेवण्याचा निर्णय घेत त्यांना रुग्णालयात दाखल करणे बंधनकारक केले. हे रुग्ण वैद्यकीय देखरेखीखाली आल्याने याचा परिणाम रुग्ण बरे होण्यावर दिसून आला आहे. यामुळे प्रकृती अचानक खालावून रुग्ण मृत्यू होण्याचे प्रमाणही कमी झाले. पहिल्या लाटेतील मार्च 2020 ते डिसेंबर 2020 या दहा महिन्यांच्या कालावधीत 51,002  एकूण रुग्णांपैकी 1051 रुग्णांचा मृत्यू झाला होता. या काळातील मृत्युदर हा 2.06 टक्के इतका होता. तर कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत जानेवारी 2021 ते 19 मे 2021 या पाच महिन्यांच्या काळात 45, 766 जणांना कोरोना संसर्ग झाला. त्यापैकी 478 रुग्णांचा मृत्यू झाला. हे प्रमाण 1.04 टक्के इतके आहे. त्यामुळे दुसर्‍या लाटेत रुग्णसंख्या नियंत्रित ठेवण्यासोबतच मृत्यू प्रमाणावरही नियंत्रण ठेवणे शक्य झाले आहे. शहरात अत्यवस्थ रुग्णांची संख्या 550 वरून 70 वर आली आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत मृत्युदर आणखी कमी करण्यासाठी पालिका प्रयत्नशील आहे. तर नवी मुंबईत शेजारील पालिकांच्या तुलनेत कोरोनामुक्तीचे प्रमाणही 96.12 टक्केवर पोहचले आहे.

पहिल्या लाटेपेक्षाही कमी दर

कोरोनाच्या पहिल्या लाटेत मार्च ते डिसेंबर या दहा महिन्यांच्या कालावधीत शहरातील कोरोना मृत्युदर हा 2.04 टक्केपर्यंत होता. जानेवारीनंतर कोरोनाची दुसरी लाट सुरू झाली असून मेपर्यंत पाच महिन्यातील मृत्यूदर हा 1.04 टक्के आहे.

कोरोनामुक्तीचे प्रमाणही वाढले

नवी मुंबईत कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात प्रसरला होता, परंतु गेल्या काही दिवसात रुग्ण कमी प्रमाणात आढळत आहेत. विशेष म्हणजे सलग 35 दिवस नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात दैनंदिन रुग्णांच्या संख्येपेक्षा कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या ही जास्त आहे. हे सर्व चित्र दिलासादायक असले तरी दैनंदिन कोरोना मृत्यू अजूनही जास्त असल्याने यावर नियंत्रण मिळविण्यात अद्याप यश आलेले नाही. ही चिंता प्रशासनासमोर कायम आहे.

कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसर्‍या लाटेत एकूण कोरोनाबाधितांच्या प्रमाणात मृत्यू होणार्‍या रुग्णांचे प्रमाण कमी आहे. पहिली लाट 10 महिने सुरू होती, मात्र दुसरी लाट कमी कालावधीत खूप पसरली व उंचही होती, परंतु कोरोना मृत्यूदर नियंत्रणात आहे. काही दिवसांपूर्वी 550 अत्यवस्थ रुग्ण होते ते आता  60 ते 70पर्यंत खाली आहेत.

-अभिजित बांगर, आयुक्त, महापालिका

Check Also

उलवे नोडमध्ये रविवारी महासंस्कृती : जागर स्त्री शक्तीचा सांस्कृतिक कार्यक्रम

भजनी मंडळांना भांडवली अनुदानाचे होणार वाटप पनवेल : रामप्रहर वृत्तमहाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग आणि …

Leave a Reply