पनवेल ः प्रतिनिधी
सध्या कोरोनातून बरे झाल्यानंतर विशेषतः डायबिटीस असलेल्या रुग्णांत म्युकरमायकोसिसची लक्षणे दिसून येत आहेत. या आजाराच्या रुग्णांवर वेळीच उपचार करण्यासाठी पनवेल महानगरपालिका हद्दीत म्युकरमायकोसिस आजाराच्या तपासणीकरिता ओपीडी सुरू करून रुग्णांवर उपचार करण्यात यावेत, अशी मागणी नगरसेवक अरुणकुमार भगत यांनी महापालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
या आजारात उपचारास विलंब झाल्याने रुग्ण दगावण्याची शक्यता असते. वेळेवर उपचार झाल्यास रुग्ण बरा होऊ शकतो. याकरिता पनवेलमधील कान, नाक, घसातज्ज्ञ, डेंटिस्ट व डायबिटीसतज्ज्ञ डॉ. समुद्रा मॅडम, नेत्ररोगतज्ज्ञ तसेच डॉ. सुहास हळदीपूरकर यांच्या समवेत चर्चा करण्यात यावी. महानगरपालिका हद्दीत कोरोनाच्या आजारातून जे रुग्ण बरे झाले असतील, त्यापैकी विशेषतः डायबिटीस असणार्या रुग्णांची माहिती मागविण्यात यावी. त्यांना फोन करून ओपीडीमध्ये बोलावून तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत त्यांची तपासणी करण्यात यावी.
ज्या रुग्णांमध्ये म्युकरमायकोसिसची लक्षणे आढळून येतील, त्यांच्यावर औषधोपचार करण्यात यावेत, असेही नगरसेवक अरुणकुमार भगत यांनी महापालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे.