प्रकल्पग्रस्तांचे रणझुंझार नेते दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला द्यावे, असा समस्त स्थानिक भूमिपुत्रांचा आग्रह आहे. त्यासाठी रायगडसह नवी मुंबई, ठाणे, मुंबई, पालघरमध्ये चळवळ उभी राहत आहे. यानिमित्ताने ‘दिबां’च्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा देणारी मालिका…
उरणच्या शेतकर्यांवर पोलिसांनी केलेल्या गोळीबाराचा सर्वत्र निषेध केला जात होता. विविध पक्षांचे नेते, कामगार संघटनांचे पुढारी यांची एक बैठक होऊन त्यांनी सरकारच्या निषेधार्थ 31 जानेवारी रोजी महाराष्ट्र बंद करण्याचा निर्णय घेतला. या बंदला सर्व संघटना, काँग्रेस वगळता सर्व राजकीय पक्ष यांनी जाहीर पाठिंबा दिला. त्यामुळे त्या दिवशी महाराष्ट्रात अभूतपूर्व असा बंद झाला. काही ठिकाणी मोर्चे काढण्यात येऊन महाराष्ट्र सरकारच्या नाकर्तेपणाचा निषेध करण्यात आला. शेतकर्यांच्या या हत्याकांडाने महाराष्ट्र हादरला होता.
महाराष्ट्रातील हा बंद 100 टक्के यशस्वी झाला. राज्यातील सारे व्यवहार, वाहतूक व्यवस्था पार कोलमडून पडली. दुकाने, हॉटेल्स सारे काही बंद होती, पण लोकांचे हाल होऊ नये म्हणून सायंकाळी हा बंद मागे घेण्यात आला. यात कामगार संघटनांच्या नेत्यांनी मोलाचे सहकार्य केले. त्यामध्ये जॉर्ज फर्नांडीस, दत्ता सामंत आणि बाळासाहेब ठाकरे या नेत्यांचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल.
कधी नव्हे ती रेल्वे वाहतूकही त्या दिवशी ठप्प झाली होती. बस, टॅक्सी रस्त्यावर दिसत नव्हत्या. उरण, पनवेल, पेण, नवी मुंबई, संपूर्ण रायगडमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. उरणमध्ये जमावबंदीचा हुकूम मोडून शेतकरी, शेतमजूर, मिठागर कामगारांनी एक प्रचंड मोर्चा काढला. त्यांना पोलिसांनी अटक केली व नंतर सोडून दिले. खोपोलीतही लोकांनी मोर्चा काढून राज्य सरकारचा निषेध केला. असे मोर्चे रोहा, पेण, ठाणे, औरंगाबाद तसेच अनेक जिल्ह्यांत लोकांनी काढले. महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली होती.
महाराष्ट्र सरकारनेही बंद यशस्वी झाल्याची कबुली दिली हा आंदोलकांचा एक प्रकारे विजय होता. या आंदोलन काळात शेतकर्यांवर झालेल्या अन्यायकारक गोळीबाराची न्यायालयीन चौकशी करावी, अशी मागणी करणारी तार माजी मुख्यमंत्री बॅ. ए. आर. अंतुले यांनी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांना केली आणि ते स्वतः जासईला आले. त्यांनी जखमी शेतकर्यांची विचारपूस केली. या वेळी ते म्हणाले, उरणच्या भूसंपादनाचा प्रश्न सरकारने पोलीस बळाचा वापर न करता सामोपचाराने सोडवला असता तर आज शेतकर्यांचे येथे रक्त सांडले नसते.
उरणच्या अनेकांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी रक्त सांडले, पण आज त्यांच्या वंशजांना आपल्या हक्कांसाठी रक्त सांडावे लागते हे दुर्देवी आहे.
अंतुले यांनी हे कितीही सांगितले तरी ते मुख्यमंत्री असताना मात्र त्यांनी शेतकर्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले. सर्वमान्य किंमत ठरलेली असताना त्यांनी ती देण्याचे टाळले आणि आता अशा प्रकारचे अश्रू ढाळून काय उपयोग? अशी भावना शेतकर्यांमध्ये होती. 1981 साली ते मुख्यमंत्री असताना जासई येथे त्यांच्याच सरकारने जमीन बचाव आंदोलकांवर लाठीमार व गोळीबार केला होता. त्यात शेतकर्यांचे नेते दि. बा. पाटील यांचेही रक्त सांडले होते याचा आंदोलकांना विसर पडला नाही.
आंदोलकांचे अश्रू पुसण्यासाठी त्यानंतर विविध पक्षांच्या मान्यवर नेत्यांनी जासईला भेट दिली. काही महिन्यांनी राष्ट्रीय संजय मंचच्या अध्यक्ष मनेका गांधी यांनीही या आंदोलनातील हुतात्म्यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले तसेच जासई गावात सभा घेऊन हुतात्म्यांच्या नातेवाइकांना आर्थिक व धान्याच्या रूपाने मदत केली. जमीन बचाव संयुक्त लढ्याचे नेते दि. बा. पाटील हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. 1984चे हे शेतकर्यांचे शौर्यशाली, गौरवशाली जमीन बचाव आंदोलन सार्या देशभर गाजले. त्यामुळे दि. बा. पाटील यांचे नावही देशात चर्चिले गेले.
Check Also
आमदार प्रशांत ठाकूर यांना महाराष्ट्र प्रदेश भाजप चिटणीसपदाची मोठी जबाबदारी
पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीची घोषणा …
RamPrahar – The Panvel Daily Paper