Breaking News

पनवेल महापालिका क्षेत्रातील पडलेली झाडे बाजूला

गाढी नदीकाठीही बांधले दोरखंड

पनवेल ः प्रतिनिधी

पनवेल महानगरपालिका क्षेत्रात विविध ठिकाणी रस्त्यावर पडलेली झाडे महापालिकेच्या अग्निशमन दल तसेच प्रभाग समितीच्या कर्मचार्‍यांच्या मदतीने काढण्यात आली. गाढी नदी काठाला लागून असलेले पटेल मोहल्ला, भारत नगर झोपटपट्टी, कोळीवाडा गाढी नदी पुलावर सुरक्षिततेसाठी पालिका कर्मचारी तसेच कोळी बांधवांच्या साहाय्याने दोरखंड बांधण्यात आले आहेत.

या वेळी अग्निशमन विभाग प्रमुख अनिल जाधव, आपत्ती व्यवस्थापन विभाग प्रमुख दशरथ भंडारी, प्रभाग अधिकारी, अमर पाटील, अरविंद पाटील, अतिक्रमण विभाग उपस्थित होते. महापालिका हद्दीतील पटेल मोहल्ला, भारत नगर झोपटपट्टी, मरिन केडमी येथील गाढी नदीच्या पाण्याची पातळीत वाढ झाल्यास  येथील नागरिकांना कोळेश्वर विद्यामंदिर आणि उर्दु शाळेमध्ये सुरक्षित ठिकाणी राहण्याची सोय करण्यात आली असल्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

पनवेलमधील इच्छापूर्ती गणेश मंदिराजवळील मोठे झाड रस्त्यावरती पडल्यामुळे वाहतुकीचा खोळंबा झाला होता,अग्निशमन विभागाच्या कर्मचार्‍यांनी कटर, दोर यांच्या साह्याने काढण्यात आले. पुरोहित हॉस्पीटलजवळ मिडल क्लास सोसायटीमध्ये गाडीवरती झाड पडले होते. ते झाड अग्निशमनच्या कर्मचार्‍यांनी वूड कटरच्या साहाय्याने कापून बाजूला केले. खारघरमधील खारघर सेक्टर 2,4,14, प्रभाग क्रमांक 6- सेक्टर 10, खारघर रेल्वे स्टेशन नावडे फेज 2, कामोठे सेक्टर 35 अशा विविध ठिकाणी रस्त्याच्याकडेची झाडे उन्मळून पडली होती. ही झाडे प्रभाग समितीच्या कर्मचार्‍यांनी बाजूला करून रस्ते वाहतुकीस मोकळे करण्यात आले आहेत.

Check Also

‘हिंद दी चादर’ गुरू तेग बहादूर यांचा 350वा शहिदी समागम

दोन दिवसीय भव्य कार्यक्रमासाठी खारघर सज्ज पनवेल : रामप्रहर वृत्तहिंदुस्थानी संस्कृती आणि मानवी मूल्यांच्या रक्षणासाठी …

Leave a Reply