अलिबाग : जिमाका
कोरोनामुळे निधन झाल्यानंतर त्या पालकांवर अवलंबून असलेल्या बालकांच्या जीवनावरही गंभीर परिणाम होत आहेत. अशा बालकांच्या काळजी व संरक्षणासाठी कृती दल स्थापन करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली हे कृतीदल कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर बालकांची काळजी व संरक्षणासाठी कार्यरत राहणार आहे. कोरोनामध्ये आई, वडिलांचा मृत्यू होऊन रायगड जिल्ह्यात अनेक बालके निराधार झाली आहेत. अशा बालकांची माहिती जनतेने जिल्हा प्रशासनाला तात्काळ द्यावी. निराधार बालकांच्या संरक्षणाची संपूर्ण जबाबदारी जिल्हा कृती दलामार्फत घेण्यात येणार असून निराधार बालकांना सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. जिल्हा कृती दलाच्या माध्यमातून या निराधार बालकांच्या संरक्षणासाठी केलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यात येऊन त्या बालकास बालगृहात दाखल करून घेण्यात येणार आहे. त्यासाठी करोनामुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांस किंवा अशा बालकांची माहिती आहे, अशा व्यक्तीस चाईल्ड हेल्पलाइन (क्र. 1098) वरसुध्दा संपर्क साधता येईल. कोरोनामुळे दोन्ही पालकांचा मृत्यू झालेल्या 0 ते 6 वर्ष या वयोगटातील बालकांसाठी एक शिशुगृह व 6 ते 18 वर्षे वयोगटातील बालकांसाठी दोन बालगृह निश्चित करण्यात आली आहेत. या संदर्भातील माहिती कोविड हॉस्पिटल व मदत केंद्रांनासुद्धा उपलब्ध करून दिल्यामुळे संबंधितांना मदत उपलब्ध करून देणे सुलभ झाले आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, रायगड अलिबाग (दूरध्वनी क्र. 02141-295321) येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास कार्यालयातील जिल्हा परिविक्षाधीन अधिकारी अशोक पाटील यांनी केले आहे.