खोपोली, खालापूर : प्रतिनिधी
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर खोपोली हद्दीत सोमवारी सकाळी (दि. 9) मुंबईला जाणारा एक टँकर पुण्याकडे जाणार्या लेनवरील दोन कारना धडकून उलटला. या अपघातात एका कारमधील तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर दोन्हीकडील वाहतूक थांबविण्यात आल्याने एक्स्प्रेस वेवर वाहनांच्या रांगाच रांगा दिसून आल्या.
मिळालेल्या माहितीनुसार गॅस भरलेला टँकर मुंबई दिशेने जात असताना एक्स्प्रेस वेवर खोपोली एक्झिटजवळ चालकाचे नियंत्रण सुटल्याने या टँकरने पुणे लेनवर जाऊन समोरील अॅसेंट व वेरणा अशा दोन कारना धडक दिली व तो उलटला. या अपघातात अॅसेंट कारमधील तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये सागर जनार्दन देशपांडे (51), योगेश सिंग (47, दोघेही पुणे) आणि चालक मोहम्मद रौफ कय्यम (वडाळा, मुंबई) यांचा समावेश असून दोन जण जखमी असल्याची माहिती मिळत आहे. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अपघातग्रस्त टँकरमध्ये गॅस भरलेला असल्याने पोलिसांनी सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून एक्स्प्रेस वेवरील दोन्हींकडची वाहने ताबडतोब थांबवली. त्याचप्रमाणे अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले होते. आडवा झालेला टँकर क्रेनच्या साह्याने सुमारे तीन तासांनंतर उभा करण्यात मदत यंत्रणांना यश आले. त्यानंतर वाहतूक पूर्ववत झाली. दरम्यान, या अपघाताची नोंद खोपोली पोलीस ठाण्यात करण्यात आली असून अधिक तपास सुरू आहे.
Check Also
25 एकांकिका राज्यस्तरीय अटल करंडक स्पर्धेच्या अंतिम फेरीत दाखल
पनवेल : रामप्रहर वृत्तश्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य …