एमपीएससीच्या पदभरतीस मान्यता
मुंबई ः प्रतिनिधी
पुण्यातील स्वप्नील लोणकर या तरुणाच्या आत्महत्येनंतर राज्य सरकारला अखेर जाग आली असून महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात एमपीएससीमार्फत विविध संवर्गातील भरण्यात येणार्या 15 हजार 511 पदांच्या भरतीस राज्य सरकारने मान्यता दिली आहे. याबाबत उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहांत माहिती दिली.
एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर मुलाखत होत नसल्याने पर्यायाने नोकरी मिळत नसल्याने पुण्यातील फुरसुंगी येथील तरुण स्वप्नील लोणकरने आत्महत्या केली. त्यानंतर एकच खळबळ उडाली. यावर विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आवाज उठवून एमपीएससी पदभरती तातडीने करण्याची मागणी केली होती.
या संदर्भात उपमुख्यमंत्री पवार यांनी एमपीएससी सदस्यांच्या सर्व जागा 31 जुलैअखेरपर्यंत भरण्यात येणार असल्याचे सोमवारी सांगितले होते. त्यांनी मंगळवारी विधानसभेत या संबंधी निवेदन ठेवले. एमपीएससीमार्फत विविध विभागांतील रिक्त पदे भरण्याची मान्यता वित्त विभागाने दिली आहे. त्यामुळे आता सन 2018पासून एमपीएससीमार्फत भरण्यात येणार्या विविध संवर्गातील पदांच्या भरतीस मान्यता देण्यात आलेली आहे. यानुसार गट ‘अ’मध्ये चार हजार 417, गट ‘ब’मध्ये आठ हजार 31 आणि गट ‘क’मध्ये तीन हजार 63 अशी एकूण 15 हजार 511 अशी तीन संवर्गातील रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
RamPrahar – The Panvel Daily Paper