नवी दिल्ली ः वृत्तसंस्था
भारताची धावपटू हिमा दास हिचे टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत खेळण्याचे स्वप्न भंगले आहे. राष्ट्रीय आंतर-राज्य अजिंक्यपद स्पर्धेत 100 मीटर हिट प्रकारात तिला दुखापत झाली. त्यामुळे 21 वर्षीय धावपटूला 100 मीटर आणि 4 बाय 100 मीटर रिले स्पर्धेच्या फायनलमधून माघार घ्यावी लागली. तिने 200 मीटर शर्यतीच्या फायनलमध्ये भाग घेतला, मात्र त्यात ती पाचवी आली.
हिमाने 2018च्या जागतिक कनिष्ठ अजिंक्यपद स्पर्धेत 400 मीटर शर्यतीत सुवर्णपदक जिंकले होते. 2018च्या आशियाई स्पर्धेत तिने 400 मीटर शर्यतीत रौप्यपदक जिंकले. याच स्पर्धेत 4 बाय 400 महिला रिले व मिश्र रिले स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या संघाची ती सदस्य होती.
‘दुखापतीमुळे कारकीर्दितील पहिल्याच ऑलिम्पिक स्पर्धेत मला सहभाग घेता येणार नाही. 100 व 200 मीटर शर्यतीत ऑलिम्पिक स्पर्धेची पात्रता मिळवण्याच्या मी जवळ होते, पण दुखापतीमुळे ही संधी हिरावली गेली,’ असे हिमाने म्हटले आहे.
कोच, सपोर्ट स्टाफ आणि माझ्या सहकार्यांचे मी आभार मानते. मी सर्वांना खात्री देते की दमदार कमबॅक करेन आणि राष्ट्रकुल स्पर्धा 2022, आशियाई स्पर्धा 2022 आणि जागतिक अजिंक्यपद स्पर्धा 2022 गाजवण्यासाठी कसून मेहनत घेईन.
-हिमा दास