Breaking News

माजी क्रिकेटपटू यशपाल शर्मा यांचे निधन

मुंबई ः प्रतिनिधी
माजी क्रिकेटपटू आणि 1983च्या विश्वविजेत्या भारतीय संघाचे सदस्य यशपाल शर्मा यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. वयाच्या 66व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. यशपाल यांनी बीसीसीआयच्या निवड समितीच्या सदस्यपदाची जबाबदारीही पार पाडली होती.
1983च्या वर्ल्डकपमध्ये भारतीय संघाने वेस्ट इंडिजविरुद्धच्या विजयासह सुरुवात केली. शर्मा यांनी यात महत्त्वाची भूमिका बजावली. जेव्हा ते क्रीजवर आले तेव्हा संघाची धावसंख्या 3 बाद 76 अशी होती. त्यानंतर भारताने 5 बाद 141 अशी मजल मारली. शर्मा यांनी 120 चेंडूंत 89 धावांची खेळी खेळली. ऑस्ट्रेलियाविरुद्ध आक्रमक 40 धावा असोत किंवा कठीण परिस्थितीत इंग्लंडविरुद्ध 61 धावांची खेळी  शर्मा यांनी भारताला नेहमीच तारले. शर्मा यांनी या स्पर्धेत 34.28च्या सरासरीने 240 धावा केल्या.
भारताकडून यशपाल शर्मा यांनी 37 कसोटी सामन्यांमध्ये 1606 धावा केल्या आहेत. यात 140 धावा ही त्यांची सर्वोत्तम खेळी होती. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्यांनी 42 सामन्यांत 28.48च्या सरासरीने 883 धावा केल्या.
दरम्यान, माजी कर्णधार कपिल देव यशपाल शर्मा यांच्या मृत्यूनंतर अश्रू रोखू शकले नाहीत. टीव्ही चॅनेलवर बोलताना ते रडू लागले.
यशपाल शर्मा दिलीप कुमार यांचे मोठे चाहते होते. पंजाबचा रणजी सामना पाहून दिलीप कुमार यांनी शर्मांसाठी बीसीसीआयमध्ये राजसिंग डूंगरपूरशी चर्चा केली होती. त्यामुळे दिलीप कुमार यांनी आपले करिअर घडवण्यात महत्वाची भूमिका बजावली होती, असे शर्मा म्हणाले होते.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply