उरण : उरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांचा शनिवारी (दि. 17) वाढदिवस आहे. सध्या सुरू असलेला वैश्विक महामारी कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक व हितचिंतकांनी वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी येऊ नये, असे आवाहन आमदार महेश बालदी यांनी केले आहे. आपल्या संदेशात त्यांनी म्हटले आहे की, दरवर्षी जनसंपर्क कार्यालय येथे आपल्यापैकी अनेकांच्या प्रत्यक्ष शुभेच्छांचा स्वीकार करीत मी जीवनातील एक नवे वर्ष सुरू करीत असतो, पण कोरोनाच्या महामारीमुळे गेल्या वर्षीपासून या स्नेहमेळाव्यात खंड पडला. तरी आपल्या शुभेच्छा माझ्यापर्यंत विविध माध्यमांतून पोहचतच असतात. आपल्या सर्वांच्या सुरक्षिततेसाठी यंदाही माझा वाढदिवस समारंभपूर्वक करण्याचे मी टाळत आहे. त्यामुळे कुणाच्याही प्रत्यक्ष शुभेच्छा स्वीकारणे मला शक्य होणार नाही. आपणही जिथे आहात तिथूनच माझे शुभ चिंतावे. त्या शुभेच्छा माझ्यापर्यंत पोहचतील. आपला स्नेह, माया व आशीर्वाद माझ्या प्रत्येक वाटचालीसाठी ऊर्जास्रोताचे कार्य करतात. ते माझ्यासोबत आहेत व सदैव राहतील याची मला खात्री वाटते. आपण सर्वांनी स्वतःची व आपल्या कुटुंबीयांची काळजी घ्यावी.
Check Also
कोप्रोली येथे पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ
भाजप तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते भूमिपूजन पनवेल : रामप्रहर वृत्त केंद्र सरकारची महत्त्वपूर्ण योजना …