Breaking News

…तर आमच्या अंगावरून जेसीबी घेऊन जावे लागेल!

  • आमदार प्रशांत ठाकूर यांचा काळुंद्रेत रूद्रावतार
  • घरे पाडण्यासाठी आलेले अधिकारी गेले परत

पनवेल ः प्रतिनिधी
पनवेल महापालिका हद्दीतील काळुंद्रे येथे भरपावसात घरे पाडण्यासाठी आलेल्या रेल्वेच्या अधिकार्‍यांना भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी कारवाई करायची असेल तर माझ्यासहीत नगरसेवक तेजस कांडपिळे आणि इतर सहकार्‍यांच्या अंगावरून जेसीबी घेऊन जावे लागेल, असे ठणकावून सांगितले. आमदार प्रशांत ठाकूर यांचा रूद्रावतार पाहून मोठ्या पोलीस बंदोबस्तासह आलेल्या रेल्वेच्या पथकाला शनिवारी (दि. 17) माघार
घेऊन परत जावे लागले.
पनवेलमधील रेल्वेच्या डीएससी यार्डच्या नवीन रेल्वे लाइनच्या मध्ये काळूंद्रे गावातील काही घरे येत आहेत. ही घरे जुनी असताना नवीन बांधली असल्याचे कारण देत या घराच्या मालकांना रेल्वेने 1 जुलै रोजी कारवाईची  नोटीस दिली होती. नगरसेवक तेजस कांडपिळे यांनी याबाबत आमदार प्रशांत ठाकूर यांना माहिती दिल्यावर शुक्रवारी सिडको कार्यालयात सिडकोचे दोन अतिरिक्त व्यवस्थापकीय संचालक, रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी, रेल्वेच्या डीएससीचे अधिकारी, आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. या बैठकीत असे ठरले की ज्यांची घरे जात आहेत त्यापैकी डीएससीच्या दृष्टिकोनातून जे काही पात्र-अपात्र आहेत ते ठरवण्यासाठी एक पद्धत ठरविण्यात यावी. त्याबाबत हरकत असल्यास अपील करण्याची संधी देण्यात येईल.  
कोकण विभागाच्या उपायुक्तांकडे अपील करायची संधी न देताच शनिवारी रेल्वेचे अधिकारी घरे पाडण्याची कारवाई करण्यासाठी पोलीस घेऊन काळुंद्रे येथे आले होते. पनवेलमध्ये जोरदार पाऊस पडत असताना आणि हवामान खात्याकडून अतिवृष्टीचा रेड अलर्ट इशारा असतानाही रेल्वेच्या अधिकार्‍यांनी पात्र-अपात्र न ठरवताच घरे पाडण्याची कारवाई करणे चुकीचे असल्याने त्यांच्या कारवाईला विरोध करून त्यांना परत पाठवण्यात आले. आता घरमालकांना सात दिवसांची मुदत देण्यात आली आहे.
या वेळी 26 गाव लोकनेते दि. बा. पाटील कृती समितीचे सुनील म्हात्रे, संजय घरत, काळुंद्रेतील शंकर म्हात्रे, शाम पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
याबाबत माहिती देताना नगरसेवक तेजस कांडपिळे यांनी सांगितले की, पनवेल महापालिका हद्दीत काळुंद्रे गावातील मिनुनाथ गोवारी आणि रेवती परदेशी यांची घरे 1992 आणि 2003मध्ये बांधलेली असल्याने त्यांना नोटीस आल्यावर ते माझ्याकडे आले. मी आमदार प्रशांत ठाकूर यांना याची माहिती दिली. त्यांनी शुक्रवारी संबंधित अधिकार्‍यांबरोबर सिडकोमध्ये बैठक घेतली. बैठकीत कारवाई कशी करायची हे ठरलेले असताना शनिवारी सकाळी रेल्वेचे पथक कारवाईसाठी आले. याबद्दल आमदारसाहेबांना कळवताच ते या ठिकाणी आले. त्यांनी डीएससीचे अधिकारी त्यागी यांच्याशी चर्चा करून दोन घरांवरील कारवाई थांबवण्यास भाग पाडले त्याबद्दल त्यांचे मी आभार मानतो.

काळुंद्रे  गावाच्या एका बाजूला रेल्वे, दुसर्‍या बाजूला द्रुतगती महामार्गाची  व राष्ट्रीय महामार्गाची सीमा तर दुसर्‍या बाजूला नदी असल्याने या गावाला वाढण्यासाठी जागाच नसल्याने स्थानिकांनी नैसर्गिक गरजेपोटी घरे बांधली आहेत. ही घरे बेकायदेशीर ठरवणे या लोकांवर अन्याय आहे. असा प्रकार अनेक गावांबाबत घडल्याने याबाबत शुक्रवारी सिडकोसोबत विस्तृत चर्चा झाली होऊन स्थानिक आमदारांना विश्वासात घेऊनच घरे पात्र-अपात्र  ठरवल्यावर कारवाई करायची असे ठरले होते. असे असताना आज कारवाई करणे चुकीचे आहे.
-आमदार प्रशांत ठाकूर, अध्यक्ष- उत्तर रायगड जिल्हा भाजप

Check Also

25 एकांकिका राज्यस्तरीय अटल करंडक स्पर्धेच्या अंतिम फेरीत दाखल

पनवेल : रामप्रहर वृत्तश्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य …

Leave a Reply