पनवेल ः रामप्रहर वृत्त
दानशूर, समाजसेवक आणि माणुसकीचा धर्म अखंड जपणारे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त लोकनेते रामशेठ ठाकूर अमृत महोत्सव समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कीर्तन महोत्सवाला हरिनामाच्या गजरात, टाळ-मृदंगाच्या निनादात व भक्तीमय वातावरणात शनिवारी (दि. 31) भव्य प्रारंभ झाला.
खांदा कॉलनीतील सीकेटी महाविद्यालयाच्या मैदानावर होत असलेल्या या महोत्सवाला पनवेल, उरण, कर्जत, खालापूर परिसरातील हजारो भाविकांनी उपस्थिती लावली. संत परंपरेचा महिमा आणि आध्यात्मिक वारसा जपणार्या या महोत्सवात नामवंत भजन गायक व कीर्तनकारांनी हजेरी लावत भाविकांना भक्तिरसात विलीन केले. या भक्तिपर्वाचा उद्देश केवळ धार्मिक नसून समाजामध्ये सकारात्मक ऊर्जा आणि संस्कार रूजवण्याचा आहे. या वेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे सामाजिक योगदान आणि त्यांची लोकनेते म्हणून असलेली प्रतिमा या निमित्ताने अनेकांनी गौरवली.
सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, अध्यात्मिक, सांस्कृतिक क्षेत्रात अग्रगण्य आणि दानशूर व्यक्तिमत्व माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा 2 जून रोजी 74वा वाढदिवस असून ते अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण करीत आहेत. त्या अनुषंगाने वर्षभर विविध समाजोपयोगी कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून त्याचा शुभारंभ संतांच्या वाणीच्या गोडव्याने झाली. तीन दिवस म्हणजेच 2 जूनपर्यंत भव्य स्वरूपात हा कीर्तन महोत्सव होणार आहे.
वारकरी सांप्रदायातील गुरूतुल्य व्यक्तींच्या प्रमुख उपस्थितीत या कीर्तन महोत्सवाची सुरुवात हरिनामाच्या गजरात प्रतिमा पूजा, वीणा, टाळ आणि पखवाज पूजनाने झाली. त्यानंतर रायगडभूषण पं. उमेश चौधरी यांचे सुश्राव्य भजन रंगले. पनवेल, उरण, कर्जत, खालापूर परिसरातील 47 हरिपाठ मंडळांचा सामुदायिक हरिपाठ अखंड भक्तिभावात झाला. यामध्ये वारकरी सांप्रदायातील महिलावर्गाची उपस्थिती मोठ्या प्रमाणात व लक्षणीय होती. त्यानंतर सायंकाळी आदरणीय गुरूतुल्य सत्कारमूर्ती कीर्तनकार महाराजांचा सत्कार सोहळा, आणि त्यानंतर हभप उमेशमहाराज दशरथे (परभणी) यांचे हरिकीर्तन आयोजित करण्यात आले होते.
या महोत्सवाच्या शुभारंभाला प्रमुख मान्यवर म्हणून लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, माजी नगराध्यक्ष जे.एम. म्हात्रे, ज्येष्ठ नेते वाय.टी. देशमुख, अरुणशेठ भगत, ‘दिबा’साहेबांचे पुत्र अतुल पाटील, जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, सदगुरू आप्पा माऊली यांचे चिरंजीव हभप विष्णूदादा मांगरूळकर, संत तुकाराम महाराज पायी कोकण दिंडी अध्यक्ष हभप पद्माकरमहाराज पाटील, बांठिया सप्ताह अध्यक्ष हभप धाऊशेठ पाटील, राष्ट्रीय कीर्तनकार हभप सुरेशमहाराज पाटील, अनंतबुवा महाराज पाटील, भजनसम्राट हभप निवृत्तीबुवा चौधरी, महाराष्ट्र वारकरी महामंडळ रायगड जिल्हाध्यक्ष हभप पुंडलिकमहाराज फडके, रायगडभूषण हभप नारायणबुवा महाराज, भाजप जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, माजी महापौर कविता चौतमोल, माजी उपमहापौर चारूशीला घरत, माजी पंचायत समिती सदस्य रत्नप्रभा घरत, माजी नगरसेविका सुशीला घरत, माजी जिल्हा परिषद सदस्य संजय पाटील, राजेंद्र पाटील तसेच प्रल्हाद केणी, अमित जाधव, माजी नगरसेवक जयंत पगडे, मनोहर म्हात्रे, गणेश कडू, अजय बहिरा, एकनाथ गायकवाड, तेजस कांडपिळे, प्रभाकर बहिरा, सुनील बहिरा, मंडळ अध्यक्ष दशरथ म्हात्रे, भूपेंद्र पाटील, विकास घरत, कामगार नेते प्रभूदास भोईर, जितेंद्र म्हात्रे, प्रवीण पाटील, हॅप्पी सिंग, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, तालुकाध्यक्ष आनंद ढवळे, रोहित जगताप यांच्यासह वारकरी संप्रदायातील मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कीर्तन महोत्सव म्हणजे कीर्तनाच्या माध्यमातून धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक जागर करणारा एक भव्य कार्यक्रम. हा एक पारंपरिक उत्सव आहे, जो महाराष्ट्रात आणि इतर मराठी भाषिक भागात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. त्यामुळे त्याचे महत्त्व आणि मान्सूनपूर्व पावसाची हजेरी लक्षात घेता येथे येणार्या वारकरी सांप्रदायातील मंडळींना या भक्तीसंगम मेळाव्यात कोणतीही कमी भासू नये यासाठी आयोजकांकडून उत्तम व्यवस्था करण्यात आली आहे. किमान तीन हजार लोकांची बैठक व्यवस्था असलेल्या या ठिकाणचा मंडप वॉटरप्रूफ पद्धतीचा उभारण्यात आला आहे. त्याचबरोबर या ठिकाणी संतांच्या मूर्ती व प्रतिमा आकर्षक अशा होत्या. मंडपामध्ये संतांच्या मूर्ती व प्रतिमांचे सादरीकरण हे विशेष लक्षवेधी ठरले. त्या प्रतिमांकडे नजर गेल्यावर भाविकांच्या मनात भक्तिभाव निर्माण होऊन जणू काही साक्षात दर्शनच झाले असा अनुभव या ठिकाणी येत आहे.
Check Also
नांदगाव येथे भाजप महायुतीचा जोरदार प्रचार
पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात …
RamPrahar – The Panvel Daily Paper