Breaking News

कोरोनाने हिरावला रोजगार

रानभाज्यांना नाही उठाव; पालीत आदिवासी भाजीविक्रेते ग्राहकांच्या प्रतीक्षेत

पाली : प्रतिनिधी

पावसाळ्यात रानावनात उगवणार्‍या रानभाज्या विकून सुधागड तालुक्यातील असंख्य आदिवासींच्या घरातील चुली पेटतात. मात्र कोरोनाचे सावट व लॉकडाऊन यामुळे सध्या या रानभाज्यांना उठावच नाही. त्यामुळे धंदा निम्म्याने कमी झाला आहे, असे पालीत बहुसंख्य आदिवासींनी सांगितले. परिणामी आदिवासींचा रोजगार हिरावला गेला आहे.

 प्रामुख्याने आदिवासी महिला रानभाज्या बाजारात विकण्यास आणतात. ओल्या काजूगरांचा हंगाम सरल्यावर पावसाळ्यात या रानभाज्या आदिवासींना हक्काचे दोन पैसे मिळवून देतात. या हंगामात शेवळं, टाकळा, कुर्डू, शेंडवळ, अळू, खरसुंडीच्या शेंगा, भारंगी, कर्टुले, फोडशी, काकडं, भोंड्याची भाजी अशा विविध रानभाज्या मिळतात. या रानभाज्या आरोग्यासाठी उपयुक्त असतात. कारण त्यात मोठ्या प्रमाणात जीवनसत्व व खनिजद्रव्य असतात. सोबतच पावसाळी मोसमात आपल्या शरीराला आवश्यक औषधी गुणधर्म त्यात सामावलेली असतात. त्यामुळे रानभाज्या खरेदी करण्यासाठी ग्राहकांची गर्दी होते. मात्र कोरोना व लॉकडाऊनमुळे या रानभाज्या घेण्यासाठी ग्राहक येत नाहीत, असे रानभाज्या विक्रेत्या महिला सांगतात.

दोन वर्षांपूर्वी रानभाज्या विकून दिवसाला 300 ते 400 रुपये मिळायचे. मात्र आता जेमतेम 150 ते 200 रुपयांवर समाधान मानावे लागत आहे. असे ताई वाघमारे या महिलेने सांगितले. सलग दुसर्‍या वर्षी कोरोना आणि लॉकडाऊन असल्याने रानभाज्यांना गिर्‍हाईक नाही. विशेष म्हणजे दर स्थिर असतांना रानभाज्या पडून राहत आहेत. पावसात दिवसभर बसूनदेखील विक्री होत नसून थोडेफार पैसे घेऊन घरी परतावे लागत आहे, असे पार्वती वाघमारे या रानभाजी विक्रेत्या महिलेने सांगितले.

कोरोना व लॉकडाऊनमुळे रानभाज्या विकल्या जात नसल्याने आदिवासींचे उत्पन्न घटले आहे. रानभाज्या विक्रीसाठी स्थानिक पातळीवर हक्काची बाजारपेठ मिळाली पाहिजे. रानभाजी महोत्सवासारखे उपक्रम राबवून प्रचार व प्रसार झाला पाहिजे.

-रमेश पवार, कोकण संघटक, अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद

Check Also

रायगड तायक्वांडो असोसिएशनतर्फे बेल्ट परीक्षा उत्तीर्ण, आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा गौरव

आमदार प्रशांत ठाकूर यांचा विशेष सत्कार पनवेल : रामप्रहर वृत्तरायगड तायक्वांडो असोसिएशनच्या वतीने बेल्ट परीक्षेत …

Leave a Reply