आम्हाला गुंड नको, खासदार हवेत

उद्धव ठाकरेंचा राणेंना टोला

रत्नागिरी ः प्रतिनिधी : लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला रंगत आली असताना राजकीय नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपात कुठेही कमी पडताना दिसत नाहीत. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाला एक परंपरा आहे. याआधी इथे गुंड होते. विनायक राऊत यांनी गुंडगिरी मोडीत काढली. आम्हाला गुंड नकोत, तर खासदार हवे आहेत, असा टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अप्रत्यक्षरित्या नारायण राणेंना लगावला. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी रत्नागिरी येथे जाहीर सभा घेतली. या वेळी ते बोलत होते.

खासदारांचे शिक्षण काढता. शिक्षण काय संतांनी घेतले होते का? बहिणाबाई न शिकता त्यांनी मोठी उंची गाठली. विनायक राऊत यांनी कधीही हातातला झेंडा बदलला नाही. निष्ठा हवी असते. समोरच्या उमेदवाराकडून तुम्ही काय निष्ठेची अपेक्षा ठेवता, अशी टीका उद्धव यांनी नारायण राणे यांच्यावर केली. या मतदारसंघात महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाकडून नारायण राणे यांचे चिरंजीव निलेश राणे निवडणूक लढवत आहेत. 

या वेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, मी महाराष्ट्रभर फिरतोय. नेतेमंडळींनी भाषणात आपण काय करतोय हे मतदारांना सांगितले पाहिजे. एका कुटुंबात वेगवेगळे झेंडे लोक घेत आहेत. तसे इथे होऊन चालायचे नाही. काही लोकांच्या सभेला गर्दी असते. आमच्या सभेला जी गर्दी असते ती मनाने आलेली लोकं असतात, असेही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात काँग्रेस-राष्ट्रवादीलाही टीकेचे लक्ष्य केले. कसे खायचे हे यांच्याकडून शिकावे. या लोकांनी आपल्या काळात कित्येक घोटाळे केले आहेत. राहुल गांधी 124 हे देशद्रोहाचे कलम काढणार, असे त्यांच्या जाहीरनाम्यात आहे. तुम्हाला देशद्रोह्यांना फासावर लटकवणारे सरकार पाहिजे की पाठीशी घालणारे सरकार पाहिजे, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसवर केली. तर शरद पवार बोलतात की, गांधी घराण्याचा आदर केला पाहिजे. आम्ही त्या काँग्रेसला मानतो ज्यांनी स्वातंत्र्यासाठी लढा दिला. त्यांना पाहून मान आदराने वर येते आणि आता मान शरमेने खाली जाते. नेहरू, महात्मा गांधी अशा अनेक क्रांतिकारकांनी जर हाल भोगले नसते, तर राहुल गांधी पंतप्रधानपदाची स्वप्ने पाहू शकले असते का, असा सवालही उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला.

आम्ही युती केली ती युती शेतकर्‍यांसाठी तसेच देशहितासाठी केली. शेतकर्‍यांसाठी कर्जमुक्ती आणि कर्जमाफी यासाठी युती केली. देव, देश आणि धर्मासाठी युती केली, असा विश्वास व्यक्त करीत धनुष्यबाणाला आणि कमळाला मत म्हणजे तुमचेस्वतःचे स्वतःला मत, तसेच हे आपल्या कुटुंबासाठी असलेले मत आहे, असे भावनिक आवाहनसुध्दा या वेळी उद्धव ठाकरे यांनी केले.

Check Also

Пинко казино: Азартные игры или развлечение?

Пинко казино: Азартные игры или развлечение? Вопрос о том, является ли Пинко казино азартной игрой …

Leave a Reply