Breaking News

पेणच्या गणेशमूर्तिकारांना फटका

कार्यशाळांमध्ये पाणी शिरून लाखोंचे नुकसान

पेण : प्रतिनिधी
गेल्या तीन दिवसांपासून सातत्याने पडणार्‍या मुसळधार पावसामुळे सोमवारी पेण तालुक्यात पूर येऊन नदी व खाडी किनारी असणार्‍या गावांत पाणी घुसले. या पुराचा फटका पेण शहर व परिसरातील नदीकाठच्या गणेशमूर्ती कार्यशाळांना मोठ्या प्रमाणात बसून, तयार मूर्तींचे नुकसान झाले आहे.
पेण शहरासह तालुक्यातील हमरापूर, जोहे, दादर, तांबडशेत, रावे, दादर या ठिकाणी शेकडो गणपतीमूर्ती कारखाने आहेत. मूर्ती घडविण्याचे काम अंतिम टप्प्यात असतानाच पुराचे पाणी अनेक कारखान्यांत घुसल्याने शेकडो तयार मूर्ती भिजून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. कच्च्या स्वरूपात असलेल्या तयार मूर्ती पाण्यात भिजल्यामुळे आता त्या पुन्हा वापरता येणार नाहीत. त्यामुळे 100 टक्के नुकसान झाले आहे. भिजलेल्या मूर्तीच्या जागी नव्याने बनविणे अशक्य आहे. परिणामी यंदा गणपती मूर्तींचा तुटवडाही भासणार आहे.
दरम्यान, आता पुरातून बचावलेल्या गणपतीच्या मूर्ती सुरक्षित ठिकाणी हलविण्यासाठी जागादेखील शिल्लक नाही. गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाच्या सावटामुळे मूर्ती दरवर्षीप्रमाने वितरीत होऊ शकल्या नव्हत्या. परिणामी विक्रीअभावी नुकसान झाले होते आणि आता पुराच्या पाण्यात मूर्ती भिजल्याने लाखोंचे नुकसान दिसत आहे. त्यामुळे मूर्तीकार चिंताग्रस्त झाले आहेत.

तुफानी पावसामुळे पेण तालुक्यातील अनेक कार्यशाळांमध्ये पुराचे पाणी घुसून गणपतीमूर्ती भिजल्या आहेत. शाडूच्या मूर्तींचे पूर्णपणे नुकसान झाले आहे. यामुळे गणेशमूर्तिकारांचे लाखोंचे नुकसान झाले आहे. राज्य शासनाने भरपाई द्यावी अशी मागणी संघटनेच्या वतीने करणार आहोत.  -अभय म्हात्रे, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य गणेश मूर्तिकार संघटना

Check Also

कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांचा शुभचिंतन सोहळा

कामोठे : रामप्रहर वृत्तरयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये इयत्ता दहावीच्या …

Leave a Reply