कर्जतमध्ये पुरानंतरही पाऊस आला मदतीला
कर्जत : प्रतिनिधी
बुधवारी मध्यरात्रीनंतरच्या पावसाने उल्हास नदी उलटून कर्जत शहर, तसेच अनेक गावांमध्ये पुराचे पाणी घुसले होते. त्यामुळे घरातील धान्यासह बहुतांश वस्तूंचे नुकसान झाले. पुराचे पाणी ओसरल्यानंतर घरात चिखल झाला. तो धुऊन काढण्यासाठी पाण्याची गरज होती. गुरुवारी पाघोळ्यांचे पाणी घेऊन नागरिक घरे स्वच्छ करतानाचे चित्र दिसत होते.
कर्जत शहरालगत असलेल्या उल्हास नदीचे पात्र उलटले आणि दोन्ही बाजूला नगर परिषद हद्दीतील गावांमध्ये पुराचे पाणी शिरले. काही ठिकाणी तळमजल्यावरील नागरिकांना झोपेत असताना पाणी अंथरुणात आल्यावर जाग आली. त्यातच वीज पुरवठा खंडित झाला असल्याने गाढ झोपेत असलेल्या नागरिकांची चांगलीच त्रेधातिरपीट उडाली. अनेकांच्या चारचाकी, दोनचाकी गाड्या पाण्यात बुडाल्या होत्या. घरातील धान्य, फर्निचर, कपडे, कागदपत्रे सारेच भिजले. हे पाणी ओसरल्यावर घरांमध्ये चिखल झाला. वीज नसल्याने पाणी नाही, त्यामुळे चिखल कसा धुऊन काढायचा हा प्रश्न सर्वांनाच पडला होता. पावसाशिवाय पर्याय नव्हता त्यामुळे ज्या पावसाने होत्याचे नव्हते केले होते, त्याच पावसाची प्रतीक्षा या पूरग्रस्तांना करावी लागली. गुरुवारी सकाळी पुन्हा पाऊस सुरू झाला आणि छपराच्या पाघोळीचे पाणी जमा करून त्यांनी आपली घरे स्वच्छ केली.
RamPrahar – The Panvel Daily Paper