Breaking News

…तोपर्यंत भात खरेदी केंद्र सुरू करू देणार नाही; थकबाकी मिळण्यासाठी कर्जत तालुक्यातील शेतकरी आक्रमक

कर्जत : बातमीदार

नेरळ येथील भात खरेदी केंद्रात गेल्या वर्षी विक्री केलेल्या भाताचे पैसे अद्यापही शेतकर्‍यांना मिळालेले नाहीत. त्यामुळे संप्तत झालेल्या या सर्व शेतकर्‍यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. जोपर्यंत थकबाकी मिळत नाही, तोपर्यंत नेरळ केंद्रात नवीन भात खरेदी करू देणार नाही, असा इशारा या शेतकर्‍यांनी दिला आहे. शेतकर्‍यांच्या उत्पादनाला चांगला मोबदला मिळावा म्हणून शासनातर्फे भात खरेदी केंद्राची संकल्पना राबविली जाते. या केंद्राद्वारे थेट शेतकर्‍यांकडून भात खरेदी करून त्याचा मोबदला शासनाकडून जातो. शासनाच्या माध्यमातून चांगला भाव आणि पैसेही हमखास मिळणार या आशेवर कर्जत तालुक्यातील चांधई, कोदिवले, बार्डी, नेरळ, कळंब, उकरूळ, चिंचवली, तळवडे, भडवळ, बोरगाव, माणगांव, वंजारपाडा या गावांमधील 12 शेतकर्‍यांनी मागील वर्षी आपले भात नेरळ येथील भात खरेदी केंद्रात विकले. या शेतकर्‍यांनी त्यावेळी आपल्या बँक खात्याची माहितीही जमा केली होती. भातविक्रीचा मोबदला बँक खात्यात जमा होईल, असे या शेतकर्‍यांना सांगण्यात आले होते. मात्र या केंद्राकडून काही तांत्रिक अडचणी, चुका झाल्याने या शेतकर्‍यांना शासनाकडून आजपर्यत पैसे मिळू शकले नाहीत. हे शेतकरी गेल्या वर्षभरापासून नेरळ येथील भात खरेदी केंद्रात आपल्या विक्री केलेल्या भाताचे पैसे मिळावे म्हणून चकरा मारत आहेत. मात्र त्यांना वेगवेगळी कारणे आणि उडवाउडवीची उत्तरे मिळत आहेत. वर्षभरात आपल्या कष्टाचे पैसे मिळत नसल्याने संतप्त झालेल्या या शेतकर्‍यांनी आता आंदोलनांचा प्रवित्रा घेतला आहे. जोपर्यंत आमचे थकबाकीचे पैसे मिळत नाहीत, तोपर्यंत कर्जत तालुक्यात भात खरेदी केंद्र सुरू करू देणार नसल्याची भूमिका त्यांनी घेतली आहे.

आमचे भात गेल्या वर्षी आम्ही नेरळ येथील भात खरेदी केंद्रात विकले होते. त्याचा मोबदला मिळावा यासाठी आम्ही वर्षभर हेलपाटे मारले. मात्र पैसे कधी मिळणार याबाबत अजूनही कोणतेही ठोस आश्वासन मिळत नाही. आमचे पैसे जोपर्यत आम्हाला मिळत नाही, तोपर्यत आम्ही या केंद्राला नवीन भात खरेदी करून देणार नाही.

-वसंत अनाजी चहाड, शेतकरी, कोदिवले, ता. कर्जत

काही तांत्रिक अडचणीमुळे या शेतकर्‍यांचे पैसे अडकले असून आम्ही या शेतकर्‍यांची थकबाकी लवकर मिळावी यासाठी प्रयत्न करीत आहोत, परंतु अलिबाग येथे वेळोवेळी पाठपुरावा करूनही वेगवेगळ्या तांत्रिक बाबी सांगून शेतकतर्‍यांचा मोबदला रखडवून ठेवला आहे.

-विष्णू कालेकर, केंद्र चालक, भात खरेदी केंद्र, नेरळ

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply