Breaking News

महाड, पोलादपूर तालुक्यातील 188 गावे अद्यापही अंधारात

अलिबाग ः प्रतिनिधी

अतिवृष्टीमुळे महाड व पोलदपूर तालुक्यातील 268 गावांचा वीजपुरवठा खंडित झाला होता. त्यापैकी 80 गावांमध्ये वीजपुरवठा सुरू करण्यात आला आहे, मात्र अतिवृष्टी होऊन सात दिवस झाले तरी या दोन तालुक्यांतील तब्बल 188  गावांमधील 68 हजार 856 वीजग्राहक आजही अंधारात आहेत. अतिवृष्टीमुळे महाड व पोलादपूर तालुक्यात महावितरणचे अतिउच्च दाबाचे दोन टॉवर कोसळले. चार सब स्टेशनमध्ये बिघाड झाला असून त्यापैकी दोन दुरूस्त करण्यात आले आहेत. 44 फिडर बिघडले. त्यातील चार दुरुस्त करण्यात आले आहेत. 810 डीटीसी नादुरुस्त झाले. त्यापैकी 57 दुरूस्त करण्यात आले. उच्चदाबाचे 88 खांब पडले. त्यातील 20 उभारण्यात आले. कमी दाबाचे 181 खांब पडले. त्यापैकी 18 उभे करण्यात आले. 1308 वितरण रोहित्र नादुस्त झाली होती. त्यापैकी  261 दुरुस्त करण्यात आली आहेत. 471 पाणीपुरवठा योजना बंद पडल्या होत्या. त्यापैकी 29 सुरू करण्यात आल्या आहेत. आठ कोविड हॉस्पिटल व वॅक्सिनेशन सेंटरचा वीजपरवठा खंडित झाला होता. त्यापैकी तीन ठिकाणी वीजपुरवठा सुरू करण्यात आला आहे. 83 मोबाइल टॉवर बंद पडले होते. त्यापैकी 19 सुरू करण्यात आले. महाड व पोलादपूर या दोन्ही तालुक्यांत मिळून 268 गावांचा वीजपुरवठा खंडित झाला होता. त्यापैकी 80 गावांचा वीजपुरवठा सुरू करण्यात आला आहे, मात्र 188 गावे अजूनही अंधारात आहेत. महाड तालुक्यातील 60 हजार 801 आणि पोलादपूर तालुक्यातील 21 हजार 159 अशा एकूण 81 हजार 906 ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला होता. त्यापैकी 12 हजार 50 ग्राहकांचा वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला आहे. अजूनही 69 हजार 856 ग्राहक विजेविना आहेत. सावित्री नदीला आलेल्या महापुराच्या पाण्यात उच्चदाब वाहिनीचे दोन टॉवर पडल्याने महाड तालुक्यातील गावांचा वीजपुरवठा खंडित झाला आहे. तथापि 26 जुलै रोजी महावितरणच्या गोरेगाव स्विचिंग उपकेंद्रातून बॅक फिडरमार्फत 22 केव्ही, लोणेरे फिडरद्वारे 22 केव्ही तसेच वाहूर फिडर चालू करून 80 गावांचा वीजपुरवठा चक्राकार पद्धतीने सुरू करण्यात आला आहे. अतिवृष्टीमुळे झालेल्या महावितरणच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत रायगडच्या दौर्‍यावर आले होते. या वेळी त्यांनी पेण, महाड, नागोठणे येथील पूरग्रस्त भागांची आणि महावितरण व महापारेषण यंत्रणेच्या झालेल्या नुकसानीची पाहणी केली.

Check Also

पनवेलमध्ये मानवी साखळीद्वारे जोरदार निदर्शने करत बांगलादेश सरकारचा निषेध

पनवेल : रामप्रहर वृत्त बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचाराविरोधात सकल हिंदू समाज रायगडच्या वतीने मंगळवारी (दि. 10) …

Leave a Reply